मुंबई : कमला मिल आगीच्या घटनेदिवशी मला राजकीय नेत्यांकडून दबावाचे फोन आले, असा खळबळजनक आरोप मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी केला. मात्र, नावं उघड करणार नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
अजॉय मेहतांनी नेमका काय आरोप केला?
“कमला मिल आगीची घटना ज्या दिवशी घडली, त्या दिवशी मला राजकीय नेत्यांकडून दबावाचे फोन आले. मी नाव उघड करणार नाही. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नगरसेवक रविराजा ते नाव सांगू शकतील.” असा अजॉय मेहता यांनी आरोप केला.
तसेच, “माझ्याकडे 17 ते 18 हॉटेल्स आणि बारची यादी आहे, ज्यासाठी माझ्यावर दबाव होता.”, असेही मनपा आयुक्तांनी सांगितले.
रुफटॉप हॉटेल प्रस्ताव रद्द करणार नाही. नियमावलीची कठोर अंमलबजावणी मात्र करणार असल्याची माहितीही अजॉय मेहतांनी दिली.
आयुक्तांनी काँग्रेसकडे अंगुलिनिर्देश केल्याने कॉग्रेसने विरोधी भूमिका घेत, आयुक्तांना बोलायचंच असेल तर स्पष्ट बोलावं असं काँग्रेसने म्हटले. आज महापालिका आयुक्तांनी सभागृहात या संदर्भात निवेदन दिलं.
काय आहे प्रकरण?
मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
1 Above पबला गुरुवार 28 डिसेंबरच्या रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला, तर इतरही अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे.