रिओ दी जनैरो : भारताचा स्टार बॉक्सर मनोज कुमारनं रिओ ऑलिम्पिकच्या अंतिम सोळात धडक मारली आहे. पुरुषांच्या 64 किलो वजनी गटात मनोज कुमारनं लिथुनियाच्या माजी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या एव्हाल्डस पेट्राउस्कसवर 2-1 अशी मात केली.


 

पहिल्या फेरीत मनोज कुमारनं 29, तर पेट्राउस्कसनं 28 गुणांची कमाई केली. मग दुसऱ्या फेरीतही मनोज कुमारनं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मात्र तिसऱ्या फेरीत पेट्राउस्कनं तिन्ही पंचांकडून प्रत्येकी दहा गुणांची कमाई केली.

 

मात्र पहिल्या दोन फेरीतला विजय मनोज कुमारला फळला आणि त्यानं या सामन्यात 2-1 असा विजय मिळवला. आता उपउपांत्यपूर्व फेरीत मनोज कुमारसमोर उझबेकिस्तानच्या पाचव्या मानांकित फाझलिदिन गैबनाझारोव्हचं आव्हान असेल. मनोज आणि फाझलिदिनमधला हा सामना रविवारी रात्री पावणेदहा वाजता खेळवला जाईल.