कोलंबो : कोलंबोतील टी-20 तिरंगी मालिकेत बांगलादेशने श्रीलंकेवर थरारक विजय मिळवला. सामन्यात प्रचंड चढउतारही पाहायला मिळाले. पण यावेळी मैदानातच दोन्ही संघातील खेळाडू भिडल्याचं पाहायला मिळलं. सुरु असलेल्या सामन्यातच बांगलादेशच्या खेळाडूंनी अखिलाडूवृत्तीचं प्रदर्शन घडवलं.


सामन्याच्या शेवटच्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर बांगलादेशचा मेहदी हसन धावबाद झाला. यावेळी षटकातला हा दुसरा बाऊंसर असल्याने नो बॉल असल्याचं सांगत मैदानाबाहेर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने पंचांशी हुज्जत घातली. यावेळी शाकीबने फलंदाजांना ड्रेसिंग रुममध्ये परतण्याच्या सूचना केल्या.

अशीच घटना क्रिकेटच्या इतिहासात 1978 साली घडली होती. टीम इंडियाचे माजी कर्णधार बिशन सिंह बेदी यांनी चालू सामन्यातच फलंदाजांना ड्रेसिंग रुममध्ये बोलाववलं होतं.

काय आहे नेमकी घटना?

19978 साली भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर होता. भारताने तीन कसोटी सामने आणि तीन वन डे खेळले होते, ज्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. कसोटी मालिका 2-0, तर वन डे मालिका 2-1 ने गमावली होती. मात्र या मालिकेतील शेवटच्या सामन्यात तेच घडलं, जे बांगलादेश आणि श्रीलंकेतील सामन्यात घडलं होतं.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 40 षटकांमध्ये 7 बाद 205 धावा केल्या होत्या. फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताने 37.4 षटकांमध्ये 2 बाद 183 धावा केल्या. मात्र यावेळी पाकिस्तानचा फलंदाज सरफराज नवाजने एका पाठोपाठ एक उसळते चेंडू टाकले. एवढंच नाही, तर 38 व्या षटकात चार चेंडू फलंदाजापासून किती तरी दूर होते. अशी परिस्थिती असतानाही पंचांनी ते चेंडू वाईड देण्याची तसदी घेतली नाही.

या घटनेनंतर सर्व जण हैराण झाले होते, कारण भारताला विजयासाठी 14 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज होती. त्यामुळे संतापलेल्या बिशन सिंह बेदी यांनी कठोर भूमिका घेत फलंदाज अंशुमन गायकवाड (78 धावा) आणि गुंडप्पा विश्वनाथ (8 धावा) यांना ड्रेसिंग रुममध्ये परत बोलावलं. त्यानंतर पाकिस्तानला विजेता संघ म्हणून घोषित करण्यात आलं.

संबंधित बातमी :

VIDEO : बांगलादेश-श्रीलंका सामन्यादरम्यान लाजिरवाणी घटना