रिओ दी जेनेरिओ: रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला अद्याप एकही पदक मिळालेलं नाही. यासाठी भारताची व्यवस्था जबाबदार असल्याचं मत बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारा भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रानं व्यक्त केलं आहे.

 

ब्रिटनचं उदाहरण देत ब्रिंदानं म्हटलं आहे की, 'देशामध्ये खेळाडूंवर गुंतवणूक केल्यानंतरच त्यांच्याकडून पदकांची अपेक्षा केली जाऊ शकते.' दरम्यान, अभिनव रिओ ऑलिम्पिकमध्ये 10 मी. एअर रायफल इव्हेंटमध्ये चौथ्या स्थानी राहिला होता. त्यामुळे त्याचं पदक थोडक्यात हुकलं.

 

बिंद्रानं भारतीय व्यवस्थेवर निशाणा साधत मंगळवारी ट्विटरवर याबाबत आपलं मत व्यक्त केलं.

 


 

'ब्रिटनने प्रत्येक पदकावर 55 लाख पाऊंड इतका खर्च केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुतंवणूक करण्याची गरज आहे. जोवर देशात व्यवस्था दुरुस्त होत नाही तोपर्यंत पदकाची अपेक्षा करता येणार नाही.' असं ट्वीट बिंद्रानं केलं.

 

बिंद्रानं आपल्या ट्वीटमध्ये ब्रिटनमधील वृत्तपत्र 'द गार्डियन'मधील प्रकाशित करण्यात आलेल्या लेखाचा संदर्भ दिला आहे. या लेखात स्पष्ट करण्यात आलं आहे की, ब्रिटननं प्रत्येक पदकासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे.

 

दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये दोन आठवड्यानंतरही भारताच्या खात्यात अजून एकही पदक जमा झालेलं नाही. भारतानं लंडन ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सहा पदकं पटकावली होती.