स्फोटाच्या वेळी कुरिअरच्या ऑफिसमध्ये तीन जण काम करत होते. मात्र या स्फोटात संदीप भुजबळ आणि संजय क्षीरसागर हे जखमी झाले. संदीपच्या चेहर्याला दुखापत झाली, तर संजयच्या हाताला आणि पायाला गंभीर जखमा झाल्यात. दोघांवर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
स्फोट झाल्याने सर्वत्र रक्ताचे डाग उडाले असून कार्यालयातील समान अस्ताव्यस्त फेकलं गेलं. पायर्यांवरील रक्ताच्या डागांवरुन स्फोटाची दाहकता समोर येते. स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिक घाबरुन त्वरित घराबाहेर पडले.
कुरिअरच्या पार्सलमधील स्पीकरच्या पाईपमध्ये पांढर्या रंगाची पावडर होती. या पांढर्या रंगाच्या पावडरचा स्फोट झाल्याने दोघांना दुखापत झाली. स्फोटाने संजय क्षीरसागरच्या हाताच्या बोटात आणि पायात पाईपचे धातू घुसले आहेत.
पार्सल अहमदनगरवरुन पुण्याच्या पत्त्यावर पाठवलं जात होतं. मात्र पाठवणाराचा पत्ता बनावट असल्याची माहिती आहे. त्यामुळे पार्सल पाठवून समोरच्या व्यक्तीच्या घातपाताची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. यावेळी बॉम्ब शोध पथक, श्वान पथक आणि फॉरेन्सीकने पाहणी केली. काही नमुनेही ताब्यात घेण्यात आले आहेत. दरम्यान एटीएसचं पथकही येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता हे पार्सल कुणी कुणाला पाठवलं, याबाबतचा तपास सुरु आहे.