कॅनडा : कॅनडाच्या एकोणीस वर्षांच्या बियान्का आंद्रेस्कूनं अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरुन नवा इतिहास घडवला आहे. बियान्कानं महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचं आव्हान 6-3, 7-5 असं मोडून काढलं. कारकीर्दीतील 24व्या ग्रँडस्लॅमच्या दिशेने कूच करणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचे स्वप्न मात्र यंदा भंगलं आहे.


पंधरावी मानांकित बियान्का यंदा पहिल्यांदाच अमेरिकन ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये दाखल झाली होती. गेली दोन वर्षे तिला पात्रता फेरीतच अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. त्याच बियान्काने यंदा पदार्पणात अमेरिकन ओपन जिंकण्याची कामगिरी बजावली. गेल्या 13 वर्षांत अमेरिकन ओपन जिंकणारी ती सर्वात अल्पवयीन टेनिसपटूही ठरली.

ग्रँड स्लॅम जिंकणारी बियान्का आजवरची पहिली कॅनेडियन नागरिक ठरली आहे. तर 2000 साली म्हणजे नव्या सहस्रकात जन्मलेली ती पहिली ग्रँड स्लॅम चॅम्पियन ठरली आहे.