मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला दुखापतीच्या कारणास्तव वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्याऐवजी पालघरच्या शार्दूल ठाकूरचा भारताच्या वन डे संघात समावेश होण्याची शक्यता आहे. भुवनेश्वरला विंडीजविरुद्धच्या टी-20 सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला वन डे मालिकेला मुकावे लागणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) शुक्रवारी अधिकृत घोषणा केली.


वेस्ट इंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेतून माघार घ्यावी लागलेला भुवनेश्वर कुमार हा भारताचा दुसरा शिलेदार ठरला आहे. शिखर धवनला दुखापतीच्या कारणास्तव या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्याऐवजी मयांक अग्रवालला भारताच्या वन डे संघात स्थान देण्यात आलं आहे. भारत आणि विंडीज संघांत 15 डिसेंबर (चेन्नई), 18 डिसेंबर (विशाखापट्टनम) आणि 22 डिसेंबरला (कट्टक) तीन वन डे सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.


विश्वचषक स्पर्धेदरम्यान भुवनेश्वर कुमारला दुखापत झाली होती. चार महिन्यांची विश्रांती आणि उपचारांनंतर भुवीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केले होते. परंतु त्याची दुखापत अजूनही पूर्णपणे बरी झाली नसल्याचं वृत्त समोर आलं आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भुवीच्या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढल्याचं पाहायला मिळालं. परिणामी त्याला विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.


भारताचा एकदिवसीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केदार जाधव, लोकेश राहुल, रिषभ पंत, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, दीपक चहर, मयांक अग्रवाल, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, मनीष पांडे


वेस्ट इंडिजचा एकदिवसीय संघः कॅरॉन पोलार्ड ( कर्णधार), जेसन होल्डर, किमो पॉल, सुनील अ‍ॅब्रॉस, शेल्डन कोट्रेल, निकोलस पूरण, शिम्रोन हेटमायर, एव्हिन लुईस, शे होप, खॅरी पिएर, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, रोमारियो शेफर्ड, हेडन वॉल्श ज्युनियर