उस्मानाबाद : उस्मानाबादमधील परंडा तालुक्यात तहसीलदारावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. भोत्रास्थित सीना नदी पात्रातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करत असताना कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्यावर वाळू माफियांना जीवघेणा हल्ला केला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या अनिलकुमार यांच्यावर बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोत्रास्थित सीना नदी पात्रात तीन ट्रॅक्टेर भोत्रा-परंडा मार्गावरील खडके वस्ती येथे रेती धुण्यासाठी आल्याची माहिती परांडाचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे हेळकर यांनी महसूल विभागातील कर्मचारी आकाश बाभळे, तलाठी चंद्रकांत सूर्यवंशी आणि कोतवाल आशिष ठाकूर यांच्यासह खडके यांच्या वस्तीवर ट्रॅक्टर ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली. कारवाई सुरु असताना एका ट्रॅक्टरने पळून जाण्याच्या प्रयत्नात हेळकर यांना रेतीने भरलेल्या ट्रॉलीखाली चिरडले. या हल्ल्यात हेळकर यांच्या कबंरेवरुन ट्रॅक्टर गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
अनिलकुमार हेळकर या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी बार्शीतल्या जगदाळे मामा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांचं सिटी स्कॅन करण्यात आलं असून ट्रॅक्टर अंगावर घातल्याने त्यांच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने त्यांच्या पाठीच्या कण्याला कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोलापूर किंवा पुणे याठिकाणी पुढील उपचारासाठी त्यांना नेण्याची तयारी आहे. बार्शीच्या जानराव हॉस्पिटलमध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळतेय.
पोलीस प्रशासनाला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक एकबाल सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरुन आरोपीसह तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहेत. महसूल विभागाकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. पंचनामा पोलीस प्रशासनाकडे पुढील कारवाईसाठी देण्यात आला आहे.