राजपूत संघाने आरोप केला आहे की, चित्रपटात महान योद्धा तानाजी मालुसरे यांच्या वंशाबद्दलची खरी माहिती, त्यांच्या घराण्याबद्दलची खरी माहिती दाखवलेली नाही. याप्रकरणी 19 डिसेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 'तान्हाजी : दी अनसंग वॉरियर' हा चित्रपट 10 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा अजय देवगणच्या अभिनय कारकिर्दीतला 100 वा चित्रपट आहे.
काय आहे तान्हाजी चित्रपट?
हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी कामी आलेला एक मावळा तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आधारीत आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण तान्हाजी ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. तर अजय देवगण याची पत्नी आणि अभिनेत्री काजोल या चित्रपटात तान्हाजी मलुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.
मराठी अभिनेते देवदत्त नागे, अजिंक्य देवदेखील या चित्रपटामध्ये भूमिका साकरत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊतने केले आहे. चित्रपटात सैफ अली खान हा मोघल किल्लेदार उदयभान राठोड याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याच्यासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार मंडळीही यात झळकणार आहेत. 'तान्हाजी'चे बजेट तब्बल 150 कोटी रुपये इतके आहे.
चित्रपटावर तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांचा आक्षेप
'तान्हाजी' या चित्रपटात तान्हाजी मालुसरे यांना साखळदंडाने बांधल्याचे दाखविणारे दृश्य आहे. या दृश्यावर तान्हाजी मालुसरे यांचे 14 वे वंशज प्रसाद मालुसरे यांनी आक्षेप घेतला आहे. आतापर्यंतच्या तान्हाजी मालुसरे यांच्या इतिहासात अशाप्रकारचा कोठेही उल्लेख नाही. त्यामुळे चित्रपटातील हा भाग वगळण्यात यावा, अशी मागणी प्रसाद मालुसरे यांनी केली.
तान्हाजी या चित्रपटात दाखविण्यात येणारा इतिहास हा तान्हाजी मालुसरे यांचा इतिहास म्हणून यापुढील काळात ओळखला जाईल. तान्हाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्यात तान्हाजी मालुसरे यांचे हात साखळदंडाने बांधलेले दाखविण्यात आले आहे. पण आतापर्यंतच्या तान्हाजी मालुसरे यांच्या इतिहासात अशा प्रकारचा प्रसंग कुठेही वाचण्यात अथवा ऐकण्यात आला नाही. त्यामुळे हा प्रसंग या चित्रपटातुन वगळण्यात यावा अशी मागणी प्रसाद यांनी केली. तसेच या चित्रपटात इतर कुठले आक्षेपार्ह दृश्य नाहीत याची खातरजमा करण्यासाठी प्रदर्शित होण्यापूर्वी हा चित्रपट मालुसरे यांच्या वंशजांना दाखविण्यात यावा अथवा चित्रपटाची स्क्रिप्ट वाचण्यास द्यावी अशी मागणीही प्रसाद मालुसरे यांनी केली.