गुरुवारी मोठ्या कालावधीनंतर भुवी (भुवनेश्वर कुमार) संघासोबत सराव करताना पाहायला मिळाला. भुवनेश्वरने दिवसभर गोलंदाजीचा सराव केला. त्यामुळे शुक्रवारच्या सामन्यात जसप्रीत बुमराहऐवजी भुवनेश्वरला संधी मिळू शकते.
भुवीसोबत रिषभ पंतही यावेळी सराव करताना पाहायला मिळाला, तिसऱ्या वनडेमध्ये पंतदेखील खेळू शकेल. परंतु पंतला कोणाच्या जागी संघात घेतले जाईल, हा प्रश्नच आहे. विश्वचषकापूर्वीची शेवटची एकदिवसीय मालिका असल्याने भारतीय संघ व्यवस्थापन सर्व खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शुक्रवारी पंत आणि भुवीला संधी मिळू शकते.
पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतले पहिले दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. त्यामुळे भारताने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. शुक्रवारचा रांचीतला सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल. तसेच हा सामना महेंद्रसिंह धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतला होम ग्राऊंडवरचा शेवटचा सामना ठरू शकतो. त्यामुळे हा सामना धोनीसाठी विशेष असेल.