नवी दिल्ली : टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि सलामीवीर फलंदाज शिखर धवन यांनी दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.


श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून माघार घेण्याबाबत शिखर आणि भुवनेश्वर यांनी विनंती केली होती. संघ व्यवस्थापनाने ही विनंती मान्य केली. तिसऱ्या कसोटीच्या संघ निवडीसाठी शिखर धवन उपस्थित असेल, अशी माहिती बीसीसीआयने दिली.

भुवनेश्वरला उर्वरित दोन कसोटी सामन्यांना मुकावं लागणार आहे. भुवनेश्वर कुमार 23 नोव्हेंबरला विवाह बंधनात अडकणार आहे. तामिळनाडूचा ऑलराऊंडर खेळाडू विजय शंकरला भुवनेश्वर कुमारच्या जागी संधी देण्यात आली. भारतीय अ संघ आणि तामिळनाडूकडून खेळताना विजय शंकरने दमदार प्रदर्शन केलं आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भुवनेश्वरने महत्त्त्वाची भूमिका निभावली. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दोन्ही डावात मिळून त्याने आठ विकेट घेतल्या. तर सलामीवीर शिखर धवनचं शतक केवळ 6 धावांनी हुकलं.

भुवनेश्वरच्या जागी इशांत शर्माचाही समावेश केला जाऊ शकतो. तर धवनच्या अनुपस्थितीत केएल राहुलच्या साथीला सलामीला मुरली विजय येण्याची शक्यता आहे.