नवी दिल्ली : कार अपघातांच्या तुलनेत दुचाकी दुर्घटनेत मृत्यू पाच पट जास्त होतात, तीन पट जास्त जखमी होतात आणि त्यांच्या उपचारासाठी सहा पट जास्त खर्च येतो, अशी माहिती कॅनडामधील एका अभ्यासातून समोर आली आहे.
2007 ते 2013 या काळात कार आणि दुचाकी अपघातात रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींच्या माहितीवरुन ‘इंस्टीट्यूट फॉर क्लिनिकल इव्हेल्यूएटिव्ह सायंसेज’ने हे संशोधन केलं.
दुचाकी अपघातात जखमी होणारे तुलनात्मकदृष्ट्या कमी वयाचे आहेत. त्यांचं सरासरी वय 36 वर्षांच्या आसपास आहे. तर कार अपघातांमध्ये जखमी होणारांचं वय जास्त असल्याचं ‘कॅनडियन मेडिकल असोसिएशन जर्नल’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासात म्हटलं आहे.
कार अपघातांच्या तुलनेत दुचाकीस्वार तीन पट जास्त जखमी झाले आहेत. तर त्यांच्या उपचारावर सहा टक्के जास्त खर्च झाला आहे. मृत्यू पाच टक्के जास्त झाले आहेत, असं संशोधकांनी म्हटलं आहे.
दरम्यान नुकत्याच अनिवार्य करण्यात आलेल्या एका नियमानुसार, आता दुचाकी खरेदी करतानाच हेल्मेट घेणं अनिवार्य आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी हा नियम तयार करण्यात आला आहे. डोक्यात इजा झाल्यामुळेच दुचाकीस्वारांचे जास्त मृत्यू होतात.