गुरुग्राम : डेंग्यूवर उपचार करताना गुरुग्राम येथील फोर्टिस रुग्णालयात चिमुकलीचा मृत्यू झाला. मात्र रुग्णालयाने नातेवाईकांना जे बिल दिलं आहे, ते धक्का देणारं आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात येत आहेत. कारण तब्बल 18 लाख रुपये बिल देण्यात आलं आहे.


जुळ्या बहिणींपैकी एक असलेल्या आद्याला दोन महिन्यांपूर्वी डेंग्यूची लागण झाली. त्यामुळे तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून फोर्टिसमध्ये नेण्यात आलं. जिथे माहिती न देता पुढच्याच दिवशी तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.

रुग्णालयाने मृतदेहाच्या कपड्यांचाही पैसा वसूल केला, आईचा आरोप

उपचारादरम्यान मुलीची प्रकृती बिघडत गेली आणि मेंदूपासून किडनीपर्यंत त्याचा परिणाम झाला. या काळात चार लाखांची तर केवळ औषधं लागली. धक्कादायक म्हणजे, ''मुलीच्या मृत्यूनंतर ज्या कपड्यांमध्ये मृतदेह देण्यात आला, त्याचे पैसेही फोर्टिस रुग्णालयाने वसूल केले. मुलीचा जीवही गेला आणि त्यात 18 लाख रुपयांचं बिल हातात दिलं'', असा आरोप मुलीच्या आई दिप्ती यांनी केला.



रुग्णालयाचं स्पष्टीकरण

याप्रकरणी फोर्टिस रुग्णालयाने लेखी स्पष्टीकरण दिलं आहे. ''सात वर्षांची मुलगी आद्याला दुसऱ्या खाजगी रुग्णालयातून 31 ऑगस्ट रोजी आणण्यात आलं. तिला डेंग्यू झाला होता, जो शॉक सिंड्रोमच्या स्तरावर होता. रुग्णालयाने उपचार सुरु केले, मात्र तिच्या पेशी कमी होत होत्या. मुलीवर उपचार करताना सर्व स्टँडर्ड प्रोटोकॉल आणि मार्गदर्शक तत्त्वांची काळजी घेण्यात आली. प्रकृती जास्त बिघडल्यानंतर मुलीला 48 तासांच्या आत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. मुलीची प्रकृती खालावली होती आणि कुटुंबीयांना याची सर्व माहिती देण्यात आली होती. 14 सप्टेंबर रोजी डॉक्टरांचा सल्ला न ऐकता मुलीला घेऊन गेले आणि त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला'', असं स्पष्टीकरण रुग्णालयाने दिलं आहे.

केंद्र सरकारने माहिती मागवली

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती मागवली आहे. कारवाई करण्याचंही त्यांनी आश्वासन दिलं. खासदार राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत ट्वीट केलं होतं.

https://twitter.com/rajeev_mp/status/932444989354786816