लंडन : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लडला देण्यात आलेल्या ओव्हर थ्रोच्या चार धावा बेन स्टोक्सने नाकारल्या होत्या अशी माहिती इंग्लडचे माजी  क्रिकेटपटू जेम्स अँडरसनने दिली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये दुसरी धाव काढताना बॅटला चेंडू लागून गेल्यामुळे देण्यात आलेल्या अतिरिक्त चार धावांना स्टोक्सने विरोध केला होता. मात्र त्या चार अतिरिक्त धावा नियमानुसारच दिल्याचे पंचांकडून त्या वेळी सांगण्यात आलं होतं.

विश्वचषकाच्या या अंतिम सामन्यात देण्यात आलेल्या निर्णयाचा अनेक आजी-माजी खेळाडूंनी विरोध केला आहे. नियमात बदल करावा अशी देखील मागणी होत असतानाच अँडरसनच्या माहितीमुळे या चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे. तज्ज्ञांच्या मते पंचाचा सहा धावा देण्याचा निर्णय चुकीचा असून पाच धावा दिल्या गेल्या  पाहिजे होत्या. पाच धावांऐवजी सहा धावा दिल्यामुळे इंग्लडला या अतिरिक्त एका धावेचा फायदा झाला. त्यामुळे 241 धावांची बरोबरी करण्यात यश आले. 'ओव्हर थ्रो'च्या अतिरिक्त धावा दिल्यामुळे आयसीसीवर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली. विश्वचषकात अंतिम सामन्यात देण्यात आलेल्या या चार धावांमुळे मॅचचे चित्र पूणर्पणे बदलले. अधिक चार धावांमुळेच हा सामना न्यूझीलंडच्या हातून निसटला.

मॅचदरम्यान मैदानावर मायकल वेगनकडून पूर्ण प्रकार जाणून घेतल्यानंतर अँडरसनने आपलं मत व्यक्त केलं आहे. अँडरसन म्हणाला, "शेवटच्या ओव्हरमध्ये मार्टिन गप्टिलच्या थ्रोमुळे इंग्लडच्या संघाला चार धावा अधिक मिळाल्या. या चार धावा नको यासाठी बेन स्टोक्स पंचाकडेही  गेला होता. मात्र अतिरिक्त धावा नियमानेच देण्यात आल्याचे सांगून पंचानी स्टोक्सची विनंती अमान्य केली होती.