पुणे : पुण्यात कधी काय होईल, सांगता येत नाही. पुण्यातील बोपोडी भागात बुधवारी घडलेला प्रकार असाच चक्रावून टाकणारा आहे. पुणे-मुंबई मार्गावर बोपोडीत बंद असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर अचानक रेल्वे इंजिन आल्यामुळे वाहन चालकांमध्ये घबराट निर्माण झाली.


रेल्वे इंजिन अचानक महामार्गावर येऊन थांबल्यानंतर हा काय प्रकार आहे, हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. रेल्वे इंजिनभोवती रेल्वे प्रशासनाचा एकही कर्मचारी रस्ता बंद करण्यासाठी नसल्यामुळे अचानक आलेल्या इंजिनला पाहून वाहनचालक गोंधळले. जिथे रस्ता मिळेल तिथून आपली वाहनं काढत होते.

सुदैवाने यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही, मात्र अचानक रस्त्यावर रेल्वे इंजिन अवतरल्यामुळे पोलीस कर्मचारी आणि रेल्वे प्रशासनाची बेपर्वाई पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. उपस्थित नागरिकांनी शेवटी रेल्वे इंजिनला मार्ग मोकळा करुन दिला.

दरम्यान, खडकी रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या गाडीला मार्ग देण्यासाठी अचानक इंजिन बोपोडीतील महामार्गावर आणलं होतं, अशी माहिती समोर येत आहे.