लंडन : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचा मारहाणीचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. त्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) स्टोक्सवर निलंबनाची कारवाई केली आहे. शिवाय स्टोक्ससोबत असलेला त्याचा सहकारी अॅलेक्स हेल्सवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली.
बेन स्टोक्स आणि हेल्स निलंबनाच्या काळात पूर्ण वेतनावर असतील. शिस्तपालन आयोगाच्या चौकशीनंतर त्यांच्याबाबात निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत त्यांची संघात निवड केली जाणार नाही, असं ईसीबीने स्पष्ट केलं आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्टोक्स दोन जणांसोबत मारहाण करताना दिसत आहे. ज्यापैकी एकाच्या हातात बाटली आहे. मारहाणीमध्ये स्टोक्सच्या हाताला दुखापत होऊनही अॅशेस मालिकेसाठी त्याची इंग्लंडच्या संघात निवड करण्यात आली होती.
पोलिसांकडून याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. पोलीस सर्व पुराव्यांची पडताळणी करतील, असं ईसीबीने यापूर्वी म्हटलं होतं. या प्रकरणी अटक केल्यानंतर स्टोक्सला वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात खेळता आलं नव्हतं.
दरम्यान याबाबतीत इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांनीही नाराजी व्यक्त केली. मालिकेच्या काळात खेळाडूंनी रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणं हे चुकीचं असल्याचं बेलिस यांनी म्हटलं होतं.