गयाना : महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतीय महिला संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत सलग तिसरा विजय मिळवला आहे. तिसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने आयर्लंडवर 52 धावांनी मात केली. आयर्लंडविरुद्धच्या सामना जिंकून भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 145 धावा केल्या. सलामीला आलेल्या मिताली राज आणि स्मृती मानधनाने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. मितालीने सलग दुसऱ्या सामन्यात आपला फॉर्म कायम ठेवत अर्धशतक झळकावले. मितालीने 56 चेंडूत 51 धावांची खेळी केली. ज्यात 4 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तर स्मृतीने 4 चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने 29 चेंडूत 33 धावांची खेळी केली. जेमिना रॉड्रिक्सने 18 धावांचे योगदान दिले. आयर्लंडकडून किम गार्थने दोन तर इमर रिचर्डसन, ल्युसी ओरिली , लॉरा डेलनीने प्रत्येकी एक गडी बाद केला.
भारतीय दिलेल्या विजयाचे लक्ष्य मैदानात उतरलेल्या आयर्लंड संघाची सुरुवात अत्यंत धीम्या गतीने झाली. आयर्लंडकडून इसबॉल जॉयसीने सर्वाधिक 33 धावा केल्या. सलामीवीर कॅरी शलिंग्टनने 23 चेंडूत 23 तर गॅबी लेविसने 19 चेंडूत केवळ 9 धावाच केल्या. कर्णधार लॉरा डेलनीने देखील 17 चेंडूत केवळ 9 धावा केल्या. यामुळे आयर्लंडचा संघ संकटात सापडला. धावांचे वाढत गेलेले अंतर आयर्लंडचा संघ भरून काढू शकला नाही.
भारतीय संघाकडून सर्वच गोलंदाजांनी चिवट मारा करत आयर्लंडच्या संघाला हात मोकळे करायला संधीच दिली नाही. मानसी जोशीने 3 षटकात केवळ 12 धावा दिल्या तर राधा यादवने 4 षटकात 25 धावा देत 3 गडी बाद केले. दीप्ती शर्माने 3 षटकात 15 धावा देत 2 गडी बाद केले तर पूनम यादवने 4 षटकात केवळ 14 धावा देत 1 गडी बाद केले. फलंदाजीत अपयशी ठरलेली कर्णधार हरमनप्रीत कौरने गोलंदाजीत करिष्मा दाखवत 3 षटकात केवळ 6 धावा दिल्या.
आयर्लंडवर मात करत भारतीय महिलांची विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Nov 2018 11:51 PM (IST)
महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतीय महिला संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत सलग तिसरा विजय मिळवला आहे. तिसऱ्या सामन्यात आयर्लंडवर 52 धावांनी मात केली. आयर्लंडविरुद्धच्या सामना जिंकून भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -