कल्याण : शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी लावलेली हजारो झाडं अज्ञात समाजकंटकांनी लावलेल्या आगीत जळून खाक झाली आहेत. अंबरनाथच्या नेवाळी परिसरात सरकारच्या वृक्षलागवड मोहिमे अंतर्गत श्रीकांत शिंदेंनी ही झाडं लावली होती.
नेवाळी परिसरातल्या तीन टेकड्यांवर वर्षभरापूर्वी सुमारे एक लाख झाडांची लागवड करण्यात आली होती. यानंतर काही दिवसांतच या झाडांना आग लावण्यात आल्याची घटना घडली होती. मात्र त्यावेळी आगीची झळ बसलेली अनेक झाडं जगवण्यात वन विभागाला यश आलं होतं.
यानंतर बुधवारी रात्री पुन्हा एकदा याच झाडांना अज्ञातांनी आग लावली. या आगीत दोन टेकड्या संपूर्णपणे जळून खाक झाल्या असून लागवड केलेली 70 टक्के झाडं जळाली आहेत.
या घटनेनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी संताप व्यक्त केला असून वन विभागाच्या दुर्लक्षामुळेच ही घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही शिंदेंनी केली आहे. या घटनेमागे माती माफियांचा हात असल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.