मुंबई: विविध क्रिकेट मालिकांसाठी भारतीय संघाची आज निवड होणार आहे. भारताचे 6 संघ आज निवडले जाणार आहेत. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर निवड समितीचं लक्ष आहे.

विराटच्या जागी श्रेयस अय्यर?

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं इंग्लंड दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी कौंटी क्रिकेट खेळण्याचा घेतलेला निर्णय श्रेयस अय्यरच्या पथ्यावर पडण्याची चिन्हं आहेत.

कारण अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून माघार घेतलेल्या विराट कोहलीच्या जागी, दिल्ली डेयरडेव्हिल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरची निवड होण्याची शक्यता आहे.



भारत आणि अफगाणिस्तान संघांमधला एकमेव कसोटी सामना 14 ते 18 जून या कालावधीत बंगळुरुत होणार आहे. याच कालावधीत विराट कोहली कौंटी क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे.

त्यामुळं त्यानं अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. विराटच्या अनुपस्थितीत मुंबईच्या श्रेयस अय्यरला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे.

दरम्यान, विराटच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात येईल.

आज भारताच्या 6 संघांची नियुक्ती

दरम्यान, आज बीसीसीआय भारताच्या 6 संघांसाठी खेळाडूंची निवड करणार आहे. यामध्ये

  • अफगाणिस्तानविरुद्धची 1 कसोटी,

  • इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ संघ

  • इंग्लंड आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिरंगी मालिकेसाठी भारत अ संघ

  • आयर्लंडविरुद्ध टी 20 संघ

  • इंग्लंड दौऱ्यासाठी टी 20 संघ

  • इंग्लंडविरुद्ध वन डे संघ


तर इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी नंतर भारतीय संघ निवडण्यात येणार आहे.

कोहलीच्या अनुपस्थितीत कोण कर्णधार?

विराट कोहली तीनही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करतो. मात्र कोहली थेट इंग्लंड दौऱ्यातच भारतीय संघासोबत असेल. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी अजिंक्य रहाणे कर्णधारपद सांभाळेल.



तर आयर्लंडविरुद्धच्या टी ट्वेण्टी सामन्यात रोहित शर्माकडे भारतीय संघाचं कर्णधारपद असेल.

हार्दिक पंड्याऐवजी विजय शंकर?

निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी कोहलीच्या जागी अय्यरला स्थान मिळेल. तर रवींद्र जाडेजाऐवजी अक्षर पटेलचा समावेश केला जाईल.

याशिवाय ऑलराऊंडर हार्दिक पंड्यालाही अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीतून वगळलं जाऊ शकतं. त्याच्या जागी विजय शंकरला स्थान मिळू शकतं.

अंबाती रायुडू

आयर्लंडविरुद्धच्या दोन टी 20 सामन्यांसाठीही आज भारतीय संघाची निवड होणार आहे. आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या अंबाती रायुडूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे या मालिकेसाठी त्याची निवड होऊ शकते.

पृथ्वी शॉ

भारताच्या अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या टीमचा कर्णधार पृथ्वी शॉ, शुभमन गिल आणि शिवम मावी यांना भारताच्या अ संघात स्थान मिळणार हे जवळपास निश्चित आहे.

इतकंच नाही तर भारतीय कसोटी संघातील 7 वरीष्ठ खेळाडूही इंग्लंड ए विरुद्धच्या सामन्यात भारताच्या अ संघात सहभागी होतील.