ठाणे: मुंब्रा बायपास मार्गाच्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूक ऐरोली, शिळफाटा मार्गे वळवण्यात आल्याने, या पर्यायी मार्गावरही पहाटेपासूनच मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.


मध्यरात्रीपासून रस्तेदुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे रात्रीपासूनच मुंब्रा बायपास रस्ता बंद करण्यात आला आहे. त्याचा ताण पर्यायी वाहतूक मार्ग ऐरोली, शिळफाटा या मार्गावर होत आहे.

पुढील दोन महिने मुंब्रा बायपास या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे या वाहतुकीचा ताण पुढी दोन महिने ऐरोली, शिळफाटा मार्गावर पडणार हे निश्चित आहे.

उरणमधील जेएनपीटी बंदरातून नाशिक आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणारी अवजड वाहनं मुंब्रा बायपास मार्गाचा वापर करतात, मात्र हा रस्ता धोकादायक झाल्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील अवजड वाहतूक दुपार आणि रात्रीच्या वेळेस ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे ग्रामीण आणि पालघर भागातून वळवण्यात येणार आहे.

वाहतुकीत काय बदल?

घोडबंदर मार्गावर दुपारी 12 ते 4 या वेळेतही नियंत्रित पद्धतीने अवजड वाहतूक सुरु ठेवण्यात येणार आहे.

भिवंडीतून जेएनपीटीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना मुंब्रा बायपासमार्गे प्रवेश बंद.

या मार्गावरील वाहतूक मानकोली, मुंबई-नाशिक महामार्ग, रांजनोली नाका, शहापूर, किन्हवली, सरळगाव, मुरबाड, कर्जत, चौकफाटामार्गे सोडण्यात येणार आहेत.

रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत भिवंडीतून मानकोली, मुंबई-नाशिक महामार्ग, रांजनोली नाका, येवई नाका, पाईपलाइन, सावद चौक, गंधारी पूल, आधारवाडी, दुर्गाडी सर्कल, पत्रीपूल, बदलापूर चौक, खोणी सर्कल, उसाटणे फाटा, तळोजा एमआयडीसीमार्गे, कळंबोली येथून प्रवेश.

संबंधित बातमी

मुंब्रा बायपास रोडच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळाला, वाहतुकीत बदल