मुंबई : बीसीसीआयनं पुरुष खेळाडूंसाठीची वार्षिक कॉण्ट्रॅक्ट्स जाहीर केले आहेत. ए, बी आणि सी या तिन्ही ग्रेड्ससाठी देण्यात येणारं मानधन दुपटीनं वाढवण्यात आलं आहे. ए ग्रेडसाठी आता एक कोटीऐवजी दोन कोटी रुपये मानधन देण्यात येईल.


ए ग्रेडमधल्या खेळाडूंमध्ये विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, रवीचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे यांनी या गटातलं आपलं स्थान कायम राखलं आहे. तर चेतेश्वर पुजारा, रवींद्र जाडेजा आणि मुरली विजय यांचा नव्याने या गटात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जाडेजाने सी गटातून थेट ए गटात उडी मारली आहे. तर विजय आणि पुजारा बी गटात होते.

बी ग्रेडमधल्या खेळाडूंसाठी 50 लाखांऐवजी एक कोटी रुपयांचं मानधन निश्चित करण्यात आलं आहे. त्यात रोहित शर्मा, लोकेश राहुल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, रिद्धिमान साहा, जसप्रीत बुमरा आणि युवराज सिंगचा समावेश आहे.

राहुल, बुमरा, युवराज आणि साहा यांचं सी गटातून बी गटात प्रमोशन झालं आहे. सुरेश रैना, अंबाती रायुडू, धवन यांना बी मधून सी गटात टाकण्यात आहे.

सी ग्रेडमधल्या खेळाडूंच्या यादीत सोळा जणांचा समावेश असून, त्यांना 50 लाख रुपयाचं वार्षिक मानधन देण्यात येईल. भारतीय खेळाडूंना कसोटी, वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठी देण्यात येणारं मानधनही आता वाढवण्यात आलं आहे. ही रक्कम अनुक्रमे 15 लाख, सहा लाख आणि तीन लाख रुपये अशी राहिल.