India vs South Africa: मायदेशातील ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपल्यानंतर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी टीम इंडिया डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुलकडे टी-20 सामन्यांचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. राहुलबाबत एक प्रोमोही बनवण्यात आला आहे. रोहित शर्माकडे वनडे आणि कसोटीची जबाबदारी दिली जाऊ शकते. रोहितला ऑस्ट्रेलिया मालिकेतून ब्रेक देण्यात आला होता.






बीसीसीआयला कॅप्टन रोहित हवाच!


वर्ल्डकपमध्ये फायनल दुर्दैवीरित्या हरल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि किंग विराट कोहली प्रचंड नाराज आहेत. दोघांनाही नाराजी लपवता आलेली नाही. दोघेही वयाच्या पस्तिशीत असल्याने क्रिकेटच्या आयुष्यातील कदाचित शेवटचा वर्ल्डकप स्मरणीय करण्यासाठी दोघेही प्राणपणाने लढले, पण त्यांना यश आलं नाही. त्यामुळे रोहित भविष्याचा विचार करू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. 






मात्र, बीसीसीआयपासून निवड समितीपर्यंत कोणीही दोघांना सोडायला तयार नाहीत. दोघांनी सुद्धा टीम इंडियाचा भाग असावा, यासाठी प्रयत्न करत आहेत. निवड समितीने तर रोहित शर्माने दीर्घकाळासाठी टी-20 खेळण्याचं ठरवल्यास नक्कीच आनंद होईल, असे मार्गच करून दिला आहे. इतकंच नाही, तर बीसीसीआय सुद्धा रोहितची आफ्रिका दौऱ्यासाठी मनधरणी करणार असल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे.


बीसीसीआय आज संघ जाहीर करणार 


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या मालिकेसाठी बीसीसीआय आज (30 नोव्हेंबर)संघ जाहीर करणार आहे. भारतीय संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. विराट कोहलीने वनडे आणि टी-20 मालिकेत खेळण्यास नकार दिला आहे. पांड्या दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुलला टी-20 चे कर्णधारपद मिळू शकते. रोहित शर्मा टीम इंडियात पुनरागमन करू शकतो.




रोहित आणि विराटही भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा भाग नाहीत. दुसरीकडे, बीसीसीआयचे सचिव जय शाह निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांची भेट घेणार आहे. ही बैठक दिल्लीत होऊ शकते. यामध्ये टीम इंडियाबद्दल चर्चा होणार आहे. पुढील वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. संघाबाबत बैठकीत त्याबाबत चर्चा होऊ शकते.


संघात बदल होण्याची शक्यता 


केएल राहुल आणि श्रेयस अय्यर कसोटी संघात पुनरागमन करू शकतात. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. टीम इंडिया बॉलिंग युनिटमध्येही अनेक बदल करू शकते. जसप्रीत बुमराह कसोटी संघात स्थान मिळवू शकतो. त्यांच्यासोबत मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनाही स्थान मिळू शकते. अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजाला प्राधान्य मिळू शकते.


इतर महत्वाच्या बातम्या