मुंबई : बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी आज ही घोषणा केली. टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक अनिल कुंबळेचा करार चॅम्पियन ट्रॉफीनंतर संपणार आहे.
क्रिकेट बोर्डाने एक अधिकृत परिपत्रक काढून जुलै महिन्यापासून मुख्य प्रशिक्षकपदासाठी नवे अर्ज मागवले आहेत. मात्र अनिल कुंबळे या अर्ज प्रक्रियेत थेट सहभागी होणार नाही. ज्या पद्धतीने बीसीसीआयने एक महत्त्वाच्या स्पर्धेआधी प्रशिक्षकाबाबत असा निर्णय घेतल्याने भारतीय क्रिकेटचं नुकसान होईल, असं जाणकारांचं मत आहे.
कुंबळेवर दबाव आणण्यासाठी बीसीसीआयचं पाऊल
अनिल कुंबळेचा बीसीसीआयसोबतचा करार जून 2017 पर्यंत आहे आणि त्याला पगारात वाढ हवी आहे. कुंबळेला वर्षाला सुमारे 6.25 कोटी रुपये मिळतात असं म्हटलं जातं. आता त्यात 150 टक्के वाढ हवी आहे. कदाचित प्रशिक्षकाला एवढे पैसे देण्याची बोर्डाची इच्छा नाही. त्यामुळे त्याच्यावर दबाव टाकण्यासाठी, बोर्ड विविध पर्यायांवर विचार करत आहे. त्यापैकी एक पर्याय म्हणजे नव्या प्रशिक्षकाचा शोध.
‘अ’ श्रेणीतल्या क्रिकेटपटूंच्या पगारात 150% वाढ करा, कुंबळे-कोहलीची मागणी
बीसीसीआयचे अधिकारी कुंबळेवर नाराज
बीसीसीआयचं विद्यमान अधिकाऱ्यांना अनिल कुंबळे पसंत नाही. बीसीसीआयचे हे अधिकारी चॅपियन्स ट्रॉफी न खेळण्याची धमकी देत होते, तेव्हा कुंबळेनेच सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या प्रशासकांच्या समितीला संदेश पाठवून, खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. ही बाब बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना आवडली नाही.
याशिवाय कसोटी, वन डे आणि टी-20 क्रिकेट खेळणाऱ्या खेळांसाठी वेगळा करार करण्याची कुंबळेची मागणी बीबीसीआयला आवडली नव्हती.
बीसीसीआयच्या वार्षिक करारातल्या ‘अ’ श्रेणीतल्या क्रिकेटपटूंच्या पगारात 150 टक्क्यांनी वाढ करावी अशी मागणी भारताचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहलीने केली आहे.
31 मे अर्जाची अखेरची तारीख
भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाच्या नियुक्तीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासकांच्या समितीने निवडलेला अधिकारी, क्रिकेट सल्लागार समितीसोबत या प्रक्रियेवर देखरेख करेल. क्रिकेट सल्लागार समितीमध्ये सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांचा समावेश आहे. पदासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 31 मे 2017 आहे.