लातूर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलं. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व चारही जण सुरक्षित आहेत.


निलंग्याहून मुंबईत येताना हा अपघात झाला. शिवाजी विद्यालय शाळेच्या मैदानातून उड्डाणानंतर 50 फुटांवर असताना, एका मिनिटाच्या आतच हेलिकॉप्टर कोसळलं. चॉपर फार उंचीवर नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

यानंतर सगळीकडे धुरळा उडाला आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. दुर्घटनेनंतर परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.

दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला, परिस्थिती नेमकी काय होती, याबाबतची माहिती आता समोर येत आहे.

हेलिकॉप्टर उडालं, 1 मिनिटात कोसळलं

दुपारी बाराच्या सुमारास हेलिकॉप्टरने उड्डाण केलं. मात्र अवघ्या 1 मिनिटाच्या आतच हवेचा दाब कमी झाल्याचं लक्षात येताच, पायलटने हेलिकॉप्टर खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी त्या मार्गात वीजेचा खांब आला. त्यावेळी हेलिकॉप्टरचा पंखा वीजेच्या खांबाला धडकला. त्याचवेळी वीजेच्या ताराही पंख्याच्या मार्गात आल्या. दरम्यानच्या काळात वीजपुरवठा खंडीत झाला. आणि क्षणार्धात हेलिकॉप्टर कोसळलं. वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे आणि हेलिकॉप्टर उंचीवर नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.



हेलिकॉप्टर कोसळलं त्यावेळी खाली ट्रक उभा होता. ट्रकच्या पुढच्या बाजूवरच हेलिकॉप्टरचा काही भाग कोसळल्यामुळे ट्रकचंही नुकसान झालं आहे.

मुख्यंत्र्यांची प्रतिक्रिया

“मी सध्या निलंग्यातच आहे, छोटासा अपघात झाला आहे.


आम्हाला कोणाला काहीच झालेलं नाही. मला तर काहीच इजा झालेली नाही.


डॉक्टरांनी तपासणी केली आहे. सुगर, ब्लड प्रेशर सगळं व्यवस्थित आहे.


ईश्वराची कृपा आणि महाराष्ट्रातील 11 कोटी 20 लाख लोकांचा आशीर्वाद


माझ्या पाठीशी असल्याने मी सुखरुप आहे.


काळजी करण्याचं कारण नाही,”


अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर एबीपी माझाशी बोलताना दिली.


नागरी हवाई उड्डाण संचालनालयची माहिती
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरने दुपारी 12 वाजता उड्डाण केलं. पण वाऱ्याचा बदलता दाब लक्षात आल्याने वैमानिकाने लॅण्डिंग करण्याचं ठरवलं. पण यादरम्यान, हेलिकॉप्टरचा पंखा वीजेच्या खांबांच्या तारांमध्ये अडकलं. यामुळे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला. चॉपरमधील सर्व सहा जण सुखरुप असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही, अशी माहिती नागरी हवाई उड्डाण संचालनालयाने दिली.


संबंधित बातम्या


लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं 


मुख्यमंत्र्यांचं कोसळलेलं हेलिकॉप्टर कोणत्या बनावटीचं? 


मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर ट्रकवर कोसळलं


PHOTO : देवेंद्र फडणवीसांच्या कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे फोटो