नवी दिल्ली : फेब्रुवारी 2021 मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात उभय संघात 4 कसोटी, 3 वन डे आणि 5 ट्वेन्टी ट्वेन्टी सामने खेळवले जाणार आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज या दौऱ्याची रुपरेषा जाहीर केली.
इंग्लंड आणि भारत संघांमधली ही द्विपक्षीय मालिका नव्या वर्षातली पहिलीच मालिका ठरणार आहे. पण त्याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची गरज असल्याचं गांगुली यांनी म्हटलं आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेचं आज आयोजन करण्यात आलं होतं.
इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेची आधीच घोषणा करण्यात आली होती. पण पहिल्यांदाच या मालिकेची रुपरेखा जाहीर करण्यात आली आहे. या संपूर्ण मालिकेच्या तारखा मात्र घोषित होणं अद्याप बाकी आहे.
या मालिकेकडे पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीनं पाहिलं जातंय. 2021 सालच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतातच ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं आयोजन केलं जाणार आहे. त्यासाठीच या मालिकेत तब्बल पाच ट्वेन्टी ट्वेन्टी सामने खेळवले जाणार आहेत.
पुढील वर्षी आयपीएलचं आयोजन भारतात?
या पत्रकार परिषदेदरम्यान सौरव गांगुली यांनी आयपीएलच्या आगामी मोसमाच्या आयोजनाबाबतही भाष्य केलं. आयपीएलच्या चौदाव्या मोसमाचं भारतातच आयोजन करण्याचा प्रयत्न असल्याचं गांगुली यांनी म्हटलं आहे.