नवी दिल्ली : 'बीसीसीआय'ने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासह सहाय्यक कर्मचारीपदासाठी अर्ज मागवले आहेत. भरती प्रक्रियेत विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह टीमला आपोआप प्रवेश मिळाला आहे.


सध्याच्या प्रशिक्षण कर्मचाऱ्यांचं कंत्राट भारताच्या वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर संपणार आहे. तीन ऑगस्टला सुरु होणाऱ्या या दौऱ्यात भारत तीन टी20, तीन वनडे आणि तीन कसोटी सामने खेळणार आहे.

मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, प्रशासकीय व्यवस्थापक या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

टीम इंडियाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे पायउतार झाल्यानंतर 2017 मध्ये अष्टपैलू क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन भूमीत कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं होतं. नुकतंच विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीतही भारतीय क्रिकेट संघाने मजल मारली होती.

मुख्य प्रशिक्षकपदासाठी पात्रता निकष काय?

1. देशाच्या कसोटी क्रिकेट संघाचा किमान दोन वर्ष सदस्य किंवा आयपीएल/आंतरराष्ट्रीय लीग/प्रथम श्रेणी संघाचा किमान तीन वर्ष मुख्य प्रशिक्षक
2. किमान 30 कसोटी सामने किंवा 50 वनडे सामने खेळण्याचा अनुभव किंवा बीसीसीआयचं तृतीय श्रेणीचं सर्टिफिकेट
3. वय वर्षे साठपेक्षा कमी