मुंबई : आज मुंबईच्या डोंगरी भागात असलेल्या केसरभाई इमारत दुर्घटनेनंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मंत्री सुभाष देसाई, रवींद्र वायकर आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासतील अडथळे दूर करण्यासाठी कायदा करण्याच्या मागणीचे निवदेन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.


मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पुनर्विकासाला मान्यता देण्यासाठी त्याचं कायद्यात रूपांतर होणं गरजेचं असल्याचं मत आदित्य ठाकरे यांनी मांडलं आहे.



नगरविकास विभागामार्फत कायद्यात लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी जेणेकरून अशा घटना मुंबईत रोखता येतील असं या निवेदनात म्हटलं आहे

एसआरए 3 बीमध्ये सुद्धा काही सुधारणा सुचविल्या गेल्या आहेत. त्याबाबत सुद्धा अधिसूचना काढावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याशिवाय, मोडकळीस आलेल्या इमारतीत राहणाऱ्या कुटुंबांना लवकरात लवकर  इतरत्र घर निर्माण करून द्यावेत अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.  मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करू अस आश्वासन दिलं आहे.

आज सकाळी साडे 11 वाजता या डोंगरी भागातील चार मजली इमारतीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 पेक्षा अधिक लोकं जखमी आहेत. 12 तास उलटले तरी घटनास्थळी ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरु असून बचावकार्य रात्री सुद्धा सुरु राहणार आहे.