मुंबई : भारताच्या एकोणीस वर्षांखालील क्रिकेट संघाच्या सदस्यांना दैनंदिन भत्त्याअभावी रोजच्या खाण्यापिण्यासाठी पदरमोड करण्याची आणि कुटुंबियांवर अवलंबून राहण्याची वेळ ओढवली आहे. प्रशिक्षक राहुल द्रविडचाही त्याला अपवाद नाही.


भारताचा अंडर-19 संघ सध्या इंग्लंडच्या अंडर-19 संघाविरुद्ध वन डे मालिकेत सहभागी झाला असून मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये सकाळचा नाश्ता विनामुल्य आहे. मात्र तिथलं जेवण युवा खेळाडूंना परवडणारं नाही.

एरवी सामन्यादरम्यान खेळाडूंना दर दिवशी सहा हजार आठशे रुपयांचा भत्ता दिला जातो. त्यासाठी बीसीसीआयच्या अकाऊंटमधून पैसे काढण्याचा आणि धनादेशावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार हा सचिवांना असतो.

मात्र बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांना सुप्रीम कोर्टाने पदावरून हटवलं आहे. त्यात एटीएममधून दर आठवड्याला केवळ चोविस हजार रुपये काढण्याची मर्यादा सरकारने घातली आहे. त्यामुळे मालिका सुरू होऊन 15 दिवस उलटल्यावरही खेळाडूंना दैनंदिन भत्ता मिळू शकलेला नाही.