मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांना विविध मुद्द्यावरून घेरण्याची रणनीती शिवसेनेनं आखली आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तिथल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कर्ज का माफ करत नाही, असा सवाल शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.
शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. त्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
कोणत्या विषयावर चर्चा झाली?
“सामान्य जनतेसाठी या सत्तेत आम्ही आहोत. राज्यातील अल्पभूधारकांना ताबडतोब कर्जमाफी द्यावी. पुन्हा कर्ज देताना व्याजमुक्त करावं”, अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
“मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मागणीला सकारात्मक आश्वासन दिलं असून, आचारसंहिता असल्यामुळे योग्य त्यावेळी बोलेन, असं त्यांनी सांगितलं”, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
परिवहन मंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री दीपक सावंत, गृहराज्य मंत्री दीपक केसरकर हे शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला उपस्थित होते.