मुंबई : आपल्या अवतीभवती अनेक घटना, दुर्घटना घडतात, त्यावेळी मदतीसाठी धैर्याने, हिमतीने धावून जातो तो वीर असतो. त्यांच्या शौर्याला सलाम केलाच पाहिजे. अर्थात हे शौर्य पूर्णपणे निस्वार्थी भावनेनं दाखवलेलं असतं. पण या शौर्याला, त्यांच्या हिमतीला दाद देत लढ म्हणणं हे आपलं कर्तव्य आहे. अशा शूरवीरांचा गौरव करण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला आहे. या कार्यक्रमात एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे, मेजर जनरल राजेंद्र निंभोरकर, अभिनेते सचिन खेडेकर आणि अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते.


दिपक जगन्नाथ चव्हाण


तिवरे धरणाच्या आवारात जवळपास 35 ते 40 घरं होती. ही घरे धरणाच्या वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहालगत होती. जेव्हा घटना घडली त्याआधी तिवरे गावात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे धरणाच्या वरच्या बाजूला डोंगराळ भागात टोकावर नेटवर्कसाठी गावकऱ्यांना जावे लागत असायचे. घटनेच्या रात्री दिपक चव्हाण हे नेटवर्कसाठी धरणाच्या वरील भागात गेले होते..पाण्याचा प्रवाहाचा आवाज मोठ्याने झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की धरण फुटलं आहे. त्यानंतर त्यांना तातडीने खाली येऊन धरण फुटल्याची आरोळी ठोकली. परीसरातील घरात जाऊन ओरडून सांगितलं की धरण फुटलं आहे पळा. त्यांच्या या तत्परतेने उर्वरित घरातील माणसे बचावली.


तुकाराम शंकर कनावजे


चिपळूणमधील तिवरे धरण फुटल्याची घटना 2 जुलै 2019 रोजी घडली. यामध्ये या परीसरातील 13 घरं आणि 24 जण वाहून गेले. त्याकाळात त्या प्रसंगात जिवाची पर्वा न करता पाण्याच्या प्रवाहातून वाहणाऱ्या लोकांना आणि कुणी झाडाचा आधार घेत तर कुणी घराच्या छपरावर आपला जीव मुठीत घेऊन आडोशाला बसत होते. वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाहाचा वेग इतका प्रचंड होता की त्यापासून वाचणे फार कठीण होते. अशा परिस्थितीत तुकाराम शंकर कनावजे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रवाहात अडकलेल्याना पाठीवर, खांद्यावर घेऊन त्यांचे प्राण वाचवले.



उमेश मराठे


भूशी धरणाच्या पाण्याचा प्रवाह अचानकपणे वाढल्याने, एका कुटुंबाचा जीव धोक्यात आला. एकाच कुटुंबातील सहा सदस्य एका दगडावर अडकले. त्यांना वाचवण्यासाठी कुणीच पुढे येत नव्हतं. तेव्हा तिथेच कणीस विकणारे उमेश मराठे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि त्या कुटुंबियाला जीवदान दिलं. उमेश हे तळेगाव एसटी डेपोत कंत्राटी स्वरुपात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. सुट्टीच्या दिवशी ते कणीस विक्री करतात.

ऋतुराज जोशी


निसर्ग ट्रस्ट ही संस्था खरंतर पर्यावरण संवर्धन आणि माऊंटेनियरिंगशी संबंधित संस्था आहे. मात्र जुलै महिन्यात महाराष्ट्राच्या इतर भागात जसं प्रलयकारी पावसाने हाहाकार उडवला त्याचप्रमाणे बदलापुरातही पावसानं धुमाकूळ घातला. बदलपुरात इतका पाऊस होता की अख्खी महाल्क्ष्मी एक्स्प्रेसची वॉटर ट्रेन झाली होती. त्याचवेळी अनेक सोसायट्या आणि बंगल्यांमध्ये पाणी साचलं आणि वरच्या मजल्यांवर लोक अडकले. त्यांना काढणं निव्वळ अशक्य होऊन बसलं. अशावेळी आपलं माऊंटेनियरिंगचं साहित्य घेऊन ऋतुराज जोशी आणि त्यांची टीम पुराच्या पाण्यात उतरली. त्यांच्याजवळ असलेले तराफे, दोर आणि इतर साहित्याचा वापर करत त्यांनी सोसायट्यांमध्ये अडकलेल्या 30 ते 40 लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं. सलग दोन दिवस पाऊस जोर धरुन होता आणि यांची टीमही काम करत होती. 2005 सालच्या प्रलयकारी पावसातही अशाच पद्धतीची मदत यांच्या टीमकडून झाली होती.


रामेश्वर सोळंके


अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील गौरखेड येथील अनेक जण वाठोडाजवळील शुकलेश्वर मंदिराजवळील पूर्णा नदीतील पुलावर गणपती विसर्जनासाठी 12 सप्टेंबर 2019 ला गेले असता पाच युवक बाप्पाची मूर्ती घेऊन नदीत उतरले. मात्र, त्यांचा तोल गेल्याने पाचही जण बुडाले. त्यावेळी मोठं धाडस करून रामेश्वर सोळंके हा युवक एकटा पूर्णा नदीत त्यांना वाचवण्यासाठी उतरला. यावेळी रामेश्वर सोळंकेने अमोल सोळंके या युवकाला वाचवलं, मात्र इतर मित्रांना वाचवण्यात त्याला अपयश आलं. या घटनेने गावात एकच धांदल उडाली. त्या चौघांचा पत्ता न लागल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी अमरावती येथील बचाव पथक दाखल झालं. त्यानंतर बुडालेल्या ऋषिकेश वानखेडे, सागर चांदुरकार, संतोष वानखेडे, सतीश सोळंके यांचे दोन दिवसांनी मृतदेह हाती लागले.


अनिल कुमार


ठाणे स्टेशनवर प्लॅटफॉर्मवरुन उतरुन ट्रॅक क्रॉस करत असताना एका व्यक्तीला अचानक ट्रेन येताना दिसली आणि त्यामुळे काय करावे हे न सुचल्याने तिथेच उभा राहिला. मात्र त्यावेळी ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवान अनिल कुमार याने स्वत:चा जीव धोक्यात घालत ट्रेनसमोर उडी मारत आधी त्या व्यक्तीला प्लॅटफॉर्मवर ढकलले आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला उडी मारत स्वत:चा जीव वाचवला. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता.



सविता मूर्तडक

शस्त्रधारी लुटारुशी दोन हात करून पळवून लावणारी नाशिकची रणरागिणी सविता मुर्तडक. 17 मे रोजी सविता मुर्तडक या अशोकनगरच्या स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्रात काम करत होत्या. तेव्हाच लूटमार करण्यासाठी आलेल्या एका चाकूधारी चोराने त्यांच्यावर हल्ला चढवला. मात्र सविता यांनी धाडस दाखवत जीवाची पर्वा न करता त्याच्याशी दोन हात करत त्याला पळवून लावलं आणि ग्राहकांचे पैसे वाचवले.

संध्या संदीप गंगावणे


गोवंडीमधून दोन मुलींना आणि घाटकोपरमधून चार मुलांना पळवून नेत त्यांचा अंगावरील दागिने चोरणाऱ्या अट्टल महिला गुन्हेगाराला देवनार पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संजना देविदास बारिया असं या आरोपी महिलेचे नाव आहे. एका चिमुरडीने दाखवलेल्या धाडसाने आणि समयसूचकतेने या महिलेला अटक तर झालीच परंतु तिच्यासह तिची मावस बहिणीही सुखरूप घरी परतली. गोवंडी येथील पाटीलवाडीमध्ये आपल्या आजारी आजोबाना मावशीकडे 12 वर्षीय संध्या संदीप गंगावणे ही चिमुरडी तिच्या आईसह साताऱ्याहून आली होती. आईने बाजूच्या दुकानावर साबण आणण्यास तिला पाठवलं. त्यावेळी आरोपी महिला संजना हिच्या सोबत तिची मावस बहीण दिव्या मारुती माने ही दिसली. तेव्हा तिने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता आरोपी महिलेने त्यांना आपल्याला मंदिर जायचे आहे आणि मी दिव्याच्या आईची मैत्रीण असल्याचं त्यांना सांगितलं आणि रिक्षात बसवून त्यांना घाटकोपरच्या दिशेने आणलं. त्यांच्या अंगावरील दागिने चोरण्याच्या उद्देशाने तिने या मुलींचं अपहरण केलं होतं. परंतु घाटकोपर पूर्व येथील लक्ष्मीनगर घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर येताच या मुली जोरात रडू लागल्याने त्या महिलेने त्यांना तिथेच सोडून पळ काढला. परंतु संध्याने त्वरित तिच्या मावस बहिणीला काही अंतरावर असलेल्या वाहतूक पोलिसांकडे नेऊन त्यांना आपल्या वडिलांना फोन लावण्यास सांगितलं. संध्याने तिच्या कुटुंबातील प्रत्येकाचा फोन नंबर पाठ असल्याने तिने दिलेल्या क्रमांकावर वाहतूक पोलिसांनी फोन लावला आणि पंतनगर पोलिसांना देखील याची माहिती दिली. पंतनगर पोलिसांनी दोन्ही मुलींना सोबत घेऊन पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी तात्काळ आरोपी महिलेचा शोध घेऊन तिला अटक केली.