डब्लिन (आयर्लंड) : बांगलादेशने आयर्लंडमधल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पाच विकेट्सनी धुव्वा उडवला. यासोबतच बांगलादेशने 2019 सालच्या विश्वचषकासाठी पात्र ठरण्याच्या दृष्टीने एक मोठं पाऊल उचललं आहे.
बांगलादेशचा हा न्यूझीलंडवर परदेशात मिळवलेला पहिलाच विजय ठरला. या विजयासह बांगलादेशने आयसीसी क्रमवारीत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.
30 सप्टेंबर 2017 रोजी आयसीसी क्रमवारीत पहिल्या आठ स्थानावर असलेले संघ 2019 सालच्या विश्वचषकासाठी थेट पात्र ठरणार आहेत. दरम्यान, डब्लिनमधल्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशला विजयासाठी 271 धावांचं आव्हान दिलं होतं.
सलामीचा तमिम इक्बाल आणि शब्बीर रहमान यांनी दुसऱ्या विकेटसाठी रचलेल्या 136 धावांच्या भागिदारीनं बांगलादेशच्या डावाचा भक्कम पाया रचला होता.
त्यानंतर मुशफिकर रहिम आणि महमदुल्लाह यांनी सहाव्या विकेटसाठी रचलेल्या 72 धावांच्या अभेद्य भागिदारीने बांगलादेशला पाच विकेट्स आणि 10 चेंडू राखून सनसनाटी विजय मिळवून दिला. मुशफिकरने नाबाद 45 आणि महमदुल्लाहने नाबाद 46 धावांची खेळी उभारली.