नवी दिल्ली: पाकिस्तानात 'अडकलेली' उज्मा अखेर आज (गुरुवार) भारतात परतली. भारतात परतल्यानंतर उज्मानं पाकिस्तानमधील आपला अनुभव जगासमोर मांडला. पाकिस्तान म्हणजे 'मौत का कुआं' आहे. यावेळी उज्मानं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले.


काय आहे नेमकं प्रकरण:

दिल्लीची राहणारी उज्मा याच महिन्यात पाकिस्तानात फिरायला गेली होती. पाकिस्तानमधील ताहीर या व्यक्तीशी तिची मलेशियात ओळख झाली होती. त्यामुळे त्याला भेटणं या हेतूनं ती पाकिस्तानात गेली होती. पण पाकिस्तानात गेल्यानंतर ताहीरनं तिचं अपहरण करुन जबरदस्तीनं निकाहनाम्यावर सह्या घेतल्या.

मी फक्त पाकिस्तानमध्ये फिरायला गेली होती, मला वाटलं की, मी 1 तारखेला गेल्यानंतर 10 किंवा 12 तारखेला परत येईन. पण असंच काहीच झालं नाही. मला माहितच पडलं नाही की, ताहीरनं मला कधी झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी एका विचित्र अशा गावामध्ये होते. तेथील लोकांचं वागणंही विचित्रच होतं. तिथं ताहीरनं माझ्यावर शारीरिक, मानसिक अत्याचारही केले. त्यानंतर त्यानं मला धमकीही दिली की, जर तू माझं म्हणणं ऐकलं नाही तर दिल्लीत असणाऱ्या तुझ्या मुलीचंही आम्ही अपहरण करु. माझ्या मुलीची भीती दाखवल्यानं मी निकाहनाम्यावर सही केली.' असं उज्मा म्हणाली.


'मी अनेक प्रयत्न केल्यानंतर ताहीर माझ्यासोबत भारतीय दूतावासामध्ये आला. मी जर बुनेर गावामध्ये अजून काही दिवस राहिली असती तर त्यानं मला नक्कीच मारुन टाकलं असतं किंवा कुणाला तरी विकलं असतं. बुनेरमध्ये माझ्यासारख्या इतरही मुली असू शकतात. त्या भारतीयच असतील असं नाही. बुनेरमध्ये कोणाचाही स्वत:चा व्यवसाय नाही. येथील बरीच लोकं मलेशियात राहतात आणि तेथील मुलींना फूस लावून इथं आणतात.' असंही उज्मा म्हणाली.



सुषमा मॅमनं माझी सर्वाधिक मदत केली : उज्मा

उज्मा म्हणाली की, 'भारतीय दूतावासानं माझ्यावर जो विश्वास दाखवला तीच गोष्ट माझ्यासाठी फार मोठी आहे. मी तेथील अधिकारी वर्गाला माझं म्हणणं सांगितलं. तेव्हा त्यांनी मला संपूर्ण मदतीचं आश्वासनं दिलं. त्यावेळी सुषमा मॅमनंही सांगितलं की, 'काहीही झालं तरी आम्ही तुला ताहीरकडे सोपावणार नाही. त्याचे हे शब्द ऐकून मला फार धीर आला.'



'पाकिस्तान 'मौत का कुआं', जाणं सोपं पण परत येणं कठीण'

पाकिस्तान 'मौत का कुआं' आहे. तिथं जाणं सोपं आहे पण परत येणं कठीण. मी सगळ्यांना सल्ला देते की, पाकिस्तानात कधीही जाऊ नका. आपला भारत देश खूप सुंदर आहे. आपल्याकडे सुषमा मॅमसारख्या परराष्ट्र मंत्री आहेत. मी आतापर्यंत दोन ते तीन देश फिरले आहेत. पण मला गर्व आहे की, मी भारतीय असल्याचा. सुषमा मॅमप्रमाणेच मी पंतप्रधान मोदींचेही आभार मानते.'