कोलकाता  : भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक निवडण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कोलकातामध्ये मंगळवारी प्रवीण आमरे, लालचंद राजपूत, अनिल कुंबळे रवी शास्त्री, टॉम मूडी आणि स्टुअर्ट लॉ यांच्या मुलाखती झाल्या. मात्र प्रशिक्षकपदाबाबत टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीकडूनही सूचना मागवल्या आहेत. त्यानुसार कोहली आज त्याचं मत मांडणार आहे.

 

 

बीसीसीआयच्या सल्लागार समितीचे सदस्य सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी जवळपास सर्वच उमेदवारांना दोन प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता, तुमचं व्हिजन काय आहे? तर दुसरा प्रश्न होता की, टीम इंडियाला परदेशात कसं जिंकवणार?

 

 

कोहलीचं मत महत्त्वाचं का?

विराट कोहली हा टीम इंडियाच्या कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. शिवाय वन डे आणि ट्वेन्टी-20 संघाच्या कर्णधारपदाचीही जबाबदारीह त्याच्यावर सोपवण्यात येऊ शकते, असं म्हटलं जात आहे.

 

 

त्यामुळे संघाच्या भविष्यातील कर्णधाराचं प्रशिक्षकासंदर्भातील मत विचारात घ्यावं, अशी बीबीसीआयची इच्छा आहे.

 

 

सुत्रांच्या माहितीनुसार, विराट कोहलीची पसंती रवी शास्त्रींना आहे. पण आज तो यासंदर्भात त्याचं मत सल्लागार समितीसमोर मांडणार आहे.

 

 

मुख्य प्रशिक्षपदसाठी कुंबळे मजबूत दावेदार

मात्र मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत माजी कसोटी कर्णधार अनिल कुंबळेचं नाव आघाडीवर आहे. कुंबळेने 132 कसोटी सामन्यात 619 विकेट्स, 271 वन डे सामन्यात 337 विकेट्स घेतल्या आहे. तसंच तो भारताचा यशस्वी गोलंदाजही आहे.

 

 

अनिल कुंबळेचं वय 45 वर्ष आहे. त्यामुळे इतर उमेदवारांच्या तुलनेत कुंबळेचं वय कमी आहे.

 

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सध्याच्या दबावाशी तो परिचीत आहे. 2010 मध्ये आयपीएलमध्येही तो खेळला आहे.

 

 

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगोलरचा मेन्टॉर म्हणून अनिल कुंबळेने काम केलं आहे.

 

 

अनिल कुंबळे हा आयसीसीच्या क्रिकेट समितीचा संचालक आहे. त्यामुळे त्याला नियामांच चांगलं ज्ञान आहे.