यवतमाळ:  सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणं, अनेकांना मदतीचा हात देणं, गावात निवडणुका असल्या की पॅनेल उभा करणं असा सोज्वळ चेहरा, गुंडांच्या टोळीचा म्होरक्या असल्याचं उघड झालं आहे.


 

यवतमाळ शहर आणि पुसदमध्ये पडलेल्या सशस्त्र दरोड्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. आठ जणांच्या या टोळीतील सहा जणांना पकडण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे या टोळीचा म्होरक्या हा दरोडे टाकून समाजकार्य करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

 

संजय विठ्ठल प्रसाद मिश्रा उर्फ पंडीत मिश्रा असं आरोपीचं नाव आहे. मिश्राने पोलीस कल्याण निधीसाठी रक्कम जमा केल्यामुळे त्याचा जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला होता.

 

या टोळीकडून तीन रिव्हॉल्व्हर, अकरा राऊंड आणि सहा घातक शस्त्र जप्त करण्यात आली आहेत.

 

संजय विठ्ठल प्रसाद मिश्रा उर्फ पंडीत मिश्रा हा या टोळीचा म्होरक्या आहे. मिश्रा हा गावपातळीवर पॅनल उभा करुन निवडणुका लढवायचा. पोलीस कल्याण निधीसाठी त्याने हजारोंची तिकीट खरेदीही केली होती. दरोड्यातील पैसे लोकांवर खर्च करून त्यांच्या मनात जागा निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

 

यवतमाळ जिल्यात जानेवारी महिन्यात २ ठिकाणी सश्त्राच्या जोरावर दरोडे पडले होते. त्याचा शोध पोलीस घेत होते. पोलिसांनी सहा महिन्यानंतर चोरीला गेलेल्या  एका मोबाईलच्या तपासाचा धागा पकडून याचा उलगडा केला.

 

संकटात गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा, ग्रामीण स्तरावरील निवडणुकीत पॅनल उभा करणारा गावपुढारी या  सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीचा मास्टर माईंड असल्याचं तपासात उघड झालं.

 

संजय विठ्ठलप्रसाद मिश्रा हा कान्हा  या गावचा उपसरपंच आहे.  या टोळीमध्ये आकाश  शर्मा ,  रमेश कदम , अजय मिश्रा ,अक्षय  ठाकूर , सुरज येरवाड, सुशील  सरगर यांचा समावेश असून यातील मास्टरमाईंड संजय विठ्ठल प्रसाद मिश्रा उर्फ पंडीत मिश्रा आणि त्याचा मेहुणा राजू पांडे  हे दोघे पसार झाले आहेत.

 

मिश्राने गाव-तालुकास्तरावरील अनेक निवडणुकांमध्ये पॅनेल उभी केले होते. कान्हा गाव आणि पुसद परिसरातील गावामध्ये तो पुढारी म्हणून ओळखला जातो. गोरगरिबांना आर्थिक मदत करणे, शिक्षणासाठी पैसा देणे, गावातील अडलेली विकासाची कामे स्वखर्चातून मार्गी लावणे, पथदिवे लावणे यामुळे तो गावात लोकप्रिय होता.

 

त्याहून कुतुहलाची बाब म्हणजे कान्हा गावात पुढारी म्हणून वावरणार्‍या या पंडित मिश्रा याचा पुसद येथे 17 मे 2016 रोजी यशवंत रंग मंदिरातील पोलीस कल्याण निधीच्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्याच हस्ते त्याचा सत्कार झाला होता.