मुंबई: भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान बजरंग पुनियाने (Bajrang Punia) भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात आपला पद्मश्री पुरस्कार परत दिला आहे. या पुरस्कार वापसीनंतर भाजपने आता बजरंग पुनियावर तुफान हल्ला चढवला. "मोदी सरकार असल्या भिकारड्या नौटंकीला भीक घालणार नाही एवढं निश्चित.मुजोर कुस्तीपटू बजरंग पुनिया याचा तीव्र निषेध", असं ट्विट भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलं.
अतुल भातखळकर यांचं ट्विट
इतिहास याद रखेगा.पद्मश्री पुरस्कार फूटपाथवर ठेवणे हा समस्त भारतीयांचा, भारत सरकारचा व देशाचा अपमान आहे. मोदी सरकार असल्या भिकारड्या नौटंकीला भीक घालणार नाही एवढं निश्चित.मुजोर कुस्तीपटू बजरंग पुनिया याचा तीव्र निषेध, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं.
इतकंच नाही तर "निवडणुका जवळ आल्या की अवॉर्ड वापसी गँग सक्रिय होते, हा २०१४ पासूनचा देशाला आलेला अनुभव आहे. ही गँग पुरस्कार तर परत करते मात्र पुरस्काराची रक्कम परत करते की नाही, हे जाणून घेण्यासाठी जनता उत्सुक आहे. सरकारी नोकऱ्या आणि निवासही परत करा", असंही अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांची निवृत्ती
लैंगिक छळाचा आरोप असलेले भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांचे निकटवर्तीय संजय सिंह (Sanjay Singh) यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदी निवड झाली. या निवडीनंतर बृजभूषण यांनी दबदबा होता आणि दबदबा कायम राहील, अशी प्रतिक्रिया दिली होती.
या निवडीनंतर भारताच्या पदक विजेत्या महिला पैलवान साक्षी मलिक आणि विनेश फोगट (Sakshi Malik and Vinesh Phogat) यांनी कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला. भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झालेली साक्षी मलिक ढसाढसा रडत बाहेर पडली होती. यानंतर बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत देण्याची घोषणा केली.
पद्मश्री पुरस्कार परत
ज्या कुस्तीने आम्हाला मान सन्मान दिला, ज्या कुस्तीने पदकं मिळवून दिली, तीच पदकं आज जबाबदारीची जाणीव करुन देत आहेत. महिला पैलवान अपामानित होऊन कुस्ती सोडत आहेत. अशावेळी आम्ही सन्मानित पैलवान काही करु शकलो नाही. आयुष्यभर बोच घेऊन जगण्यापेक्षा, मी माझा सन्मान, पद्मश्री पुरस्कार परत करतोय, असं पत्र बजरंग पुनियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं.