बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक
एबीपी माझा वेब टीम | 16 Aug 2016 01:58 AM (IST)
रिओ दी जनैरो : भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने रिओ ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. सिंधूने जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या चायनीज तैपेईच्या तै त्झू यिंगचा अवघ्या 40 मिनिटांत फडशा पाडला. सिंधूने हा सामना 21-13, 21-15 असा सहज जिंकला. सिंधूसमोर आता उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या वर्ल्ड नंबर टू वॅन्ग यिहानचं आव्हान असून हा सामना 17 ऑगस्टला पहाटे 3 वाजून 25 मिनिटांनी खेळवला जाईल. 2012 च्या लंडन ऑलिम्पिक्समध्ये वॅन्ग यिहाननं रौप्यपदकाची कमाई केली होती. पण गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सामन्यात सिंधूनं वॅन्ग यिहानला धूळ चारली होती.