मेनबर्न : सहा बॉलमध्ये सहा विकेट्स. क्रिकेटमध्ये कोणत्याही गोलंदाजाचं हे स्वप्न असतं. हा पराक्रम ऑस्ट्रेलियाच्या एका क्रिकेटरने केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोल्डन पॉईंट क्रिकेट क्लबतर्फे खेळताना अॅलेड कॅरीने ही कामगिरी केली. त्याने एकाच षटकात तीन-चार नाही तर तब्बल सहा फलंदाजांना बाद केलं.

29 वर्षीय कॅरीला ईस्ट बेलार्ट संघाविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या आठ षटकात एकही विकेट मिळाली नव्हती. पण नवव्या षटकात त्याने कमालच केली. प्रत्येक गोलंदाजांचं स्वप्न असतं अशी कामगिरी त्याने केली.

नवव्या षटकाच्या पहिल्या बॉलवर फलंदाज स्लिपमध्ये झेलबाद झाला. तर विकेटकीपरच्या हातात झेल देऊन पुढचा फलंदाज माघारी परतला. तिसऱ्या चेंडूवर फलंदाज पायचीत झाला.

https://twitter.com/GoldenPointCC/status/822719319079456768

संघाचे सर्व खेळाडून कॅरीच्या यशाचं जल्लोष करत होते. पण खेळ अजूनही बाकी होता. अॅलेड कॅरीने पुढच्या तीन बॉलवर तीन फलंदाजांना बोल्ड केलं. परिणामी ईस्ट बेलार्ट संघाचा डाव अवघ्या 40 धावांवरच आटोपला.

"त्यावेळी मैदानात थोडेच प्रेक्षक उपस्थित होते. पण काहींतरी खास घटणार असल्याचा कुणकुण काही प्रेक्षकांना लागली. त्यांनी कॅरीची पाचवी आणि सहावी विकेट रेकॉर्ड केली. आम्ही बॉल ठेवला आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या अवॉर्ड नाईटमध्ये ट्रॉफी देणार आहे. जेणेकरुन तो त्याच्या यशाचं सेलिब्रेशन करेल," असं गोल्डन पॉईंट क्रिकेट क्लबचे सचिव जॉन ओगिलवी यांनी सांगितलं.