वॉशिंग्टन : सीरियासह सात मुस्लीमबहुल देशातील निर्वासितांना अमेरिकेत आगामी चार महिने प्रवेश करता येणार नाही, असा निर्णय अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. पेंटागॉन येथील भेटीदरम्यान त्यांनी ही माहिती दिल्याचं वृत्त 'रॉयटर' या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
सीरियासह सात देशातील नागरिकांना पुढील 90 दिवस अमेरिकेत कोणत्याही कामासाठी जाता येणार नाही. तर निर्वासितांना चार महिन्यांची तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. सीरिया, इराण, इराक, लीबिया, सोमालिया, सुदान, येमेन या सात देशांचा यामध्ये समावेश आहे.
अमेरिकेतील दहशतवाद संपवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेवर प्रेम करतील आणि देशाच्या हिताचा विचार करतील, त्यांनाच अमेरिकेत जागा दिली जाईल, असं ट्रम्प यांनी पेंटागन येथे सांगितलं.
दरम्यान अमेरिकेतील काही नागरी हक्क गटांनी ट्रम्प यांचा हा निर्णय भेदभावात्मक असल्याची टीका केली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयानंतरही निर्वासितांना मिळेल तिथे जागा देऊ आणि निर्वासितांचं स्वागत करणारी भूमी अशी अमेरिकेची ओळख करु, असं या गटांनी आव्हान दिलं आहे.