कोलकाता : वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने संघर्षपूर्ण लढतीत चोकर्सचा शिक्का बसलेल्या दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत फायनल गाठली आहे. त्यामुळे 19 नोव्हेंबर रोजी टीम इंडियाशी (India vs Australia World Cup Final) ऑस्ट्रेलियाचा महामुकाबला होईल. दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या 213 धावांचे आव्हान गाठताना चांगलीच दमछाक झाली. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी केलेली हाराकिरीच या सामन्यात महागात पडली आणि वर्ल्डकप फायनलचे स्वप्न भंगले. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर हेडने केलेली 62 धावांची खेळी निर्णायक ठरली. स्टार्क आणि कॅप्टन कमिन्सने निवांत खेळ करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. दबावानंतर भारताने 200 धावांचे सोपे लक्ष्य गाठले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेकडून मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. परंतु, नंतर सलग 7 सामन्यांत अपराजित राहून त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकपच्या इतिहास आठव्यांदा फायनल गाठली आहे.
ऑस्ट्रेलियाने 2003 मध्ये टीम इंडियाचा फायनलमध्ये पराभव केला होता. त्यानंतर 2015 मध्ये सेमीफायनलमध्ये पराभव केला होता. मात्र, त्यानंतर 2019 आणि 2023 मध्ये साखळी लढतीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला धुळ चारली होती.
आत्मविश्वास आणि घरच्या प्रेक्षकांचा फायदा हे भारतासाठी विजयाची सर्वात मोठी शक्ती असेल. तर पाचवेळ वर्ल्डक विजेता ऑस्ट्रेलिया त्याच्या आक्रमक आणि दमछाक करणाऱ्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. मोठ्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघ खूप वरचढ आहे. आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया 13 वेळा आमनेसामने आले आहेत.
यामध्ये ऑस्ट्रेलियाने 13 पैकी 8 सामन्यात भारतावर विजय मिळवला आहे. 2015 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि 2003 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.
इतर महत्वाच्या बातम्या