मुंबई : महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल भाजपला असूया आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी केला आहे. नवीन अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरम् ने व्हायला हवी होती. त्याशिवाय अधिवेशन सुरू होऊ शकत नाही. आम्हाला रात्री एक वाजता अधिवेशनाबाबत निरोप आले. आमचे सदस्य पोहचू शकू नये म्हणून आम्हाला रात्री एक वाजता कळवलं का? हे अधिवेशन संविधानानुसार होत नाहीये, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. तसंच शपथविधीवेळी नावं घेतल्याच्या मुद्द्यावर देखील बहुमत चाचणीच्यावेळी भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घालत सभात्याग केला.


यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे आज पहिल्यांदा विधीमंडळातील या सभागृहात आले. विरोधी पक्षानं त्यांचा मान राखणं आवश्यक होतं. परंतु तसं झालं नाही. तसंच यावेळी त्यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे आभार मानले. घोडेबाजाराला वाव न दिल्यामुळे त्यांनी अध्यक्षांचे आभार मानले. तसंच पुढील पाच वर्षेही घोडेबाजार होऊ देणार नाही, असा विश्वास असल्याचंही ते म्हणाले.

मंत्र्यांनी घटनेनुसार शपथ न घेतल्याचा आरोप करणाऱ्या फडणवीसांवर जयंत पाटलांसह छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांनी देखील उत्तर दिलं. पाटील म्हणाले की, मंत्र्यांनी शपथ घेताना जे हातात होतं तेच वाचलं. एखादं चांगलं काम करत असताना मोठे व्यक्ती किंवा महापुरुषांचा उल्लेख कुणी केला विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतलं, शाहू महाराज, आंबेडकर ,महात्मा फुले नाव घेतलं तर राग का आला? असा सवाल त्यांनी केला. पिढ्यान पिढ्या ह्यांच्या मनात असूया आहे. विरोधी पक्ष दर्जेदार असावे. उद्धव ठाकरे पहिल्यांदा इथे, त्यांचा सन्मान ठेवला जावा. आता घोडेबाजार या पाच वर्षात विधान सभेत होणार नाही याची खातरजमा झाली आहे, असेही पाटील म्हणाले.

यावेळी ते भुजबळ म्हणाले की, राज्यपालांची शपथ जशीच्या तशी वाचली. इ शपथ घेताना संसदेत पण जय श्रीराम आणि अशा घोषणा केल्या जातात. मग संसद रद्द करावी लागेल. त्यांच्या आरोपात तथ्य नाही. ते म्हणाले होते मजबूत विरोधी पक्ष हवे आम्ही त्यांना दिला आहे, असे भुजबळ म्हणाले.

मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, विरोधी पक्षाने मुख्यमंत्री अभिनंदन करायला पाहिजे होतं. प्रचाराच्या काळात फडणवीस म्हणायचे मला विरोधी पक्ष नेता दिसत नाही. त्यावेळी मी तेव्हा म्हटलं होतं तुम्ही आरशात उभे राहा दिसेल.



 नियम धाब्यावर बसवून कामकाज सुरू -  देवेंद्र फडणवीस

फडणवीस यांनी पुन्हा आक्षेप घेत मला संविधानाने बोलण्याचा अधिकार आहे, मला कोणी रोखू शकणार नाही, असे ते म्हणाले.  नियमानुसार जर शपथ घेतली नाही तरच ती ग्राह्य मानली जात नाही.  ओबामा ह्यांनी चुकीची शपथ घेतली म्हणून दुसऱ्या दिवशी घ्यावी लागली.  संविधानानुसार शपथ घेतली नाही म्हणून परिचय करून देणे योग्य नाही, असे ते म्हणाले. प्रोटेम स्पीकर निवडीबाबत आक्षेप घेत ते म्हणाले की, तुम्ही सांगता हे नवीन अधिवेशन नाही, जुने नाही. देशाच्या इतिहासात प्रोटेम स्पीकर बदलला नाही, असे त्यांनी सांगितलं. एक हंगामी अध्यक्ष  हटवून दुसरा  हंगामी अध्यक्ष  नेमण्यात आला.  सगळ्या गोष्टींची पायमल्ली होते आहे.  महाराष्ट्र विधान सभा इतिहासात हंगामी अध्यक्षांनी बहुमताचा प्रस्ताव मांडलेला नाही. हंगामी अध्यक्ष निवडणूक झाल्याशिवाय बहुमत प्रस्ताव येत नाही, असेही फडणवीस म्हणाले.  नियम धाब्यावर बसवून कामकाज सुरू, असल्याचं ते म्हणाले.

राज्यपालांनी ऑर्डर काढली - अध्यक्ष

यावर अध्यक्ष म्हणाले की, मंत्र्याच्या शपथेबद्दल बद्दल जे मुद्दे उपस्थित केले, शपथविधी सभागृहात झाला नाही. याचा संबंध राज्यपालांच्या कार्यालयाशी आहे. मी भाष्य करणार नाही. हंगामी अध्यक्ष प्रोटेम स्पीकर नेमण्याचे अधिकार कॅबिनेटला आहेत. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर राज्यपालांनी ऑर्डर काढली, असे अध्यक्षांनी सांगितलं.  सभागृहात अधिवेशन बोलवलं, अधिवेशन संस्थगित झाली. सात दिवसाच्या आत सभागृह बोलवत येतं.  त्यामुळे राज्यपालांनी शपथविधी झाला तेव्हा बैठक झाली. काल राज्यपालांनी परवानगी अधिवेशन दिली. त्यामुळे हे अधिवेशन कायदेशीर आहे, असे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. तसेच तुमचा मुद्दा फेटाळून लावतो, असे त्यांनी सांगितले. यानंतर भाजपचे सदस्य वेलमध्ये उतरुन गोंधळ सुरु केला. दादागिरी नहीं चलेगी, यासारख्या घोषणा देत भाजप सदस्यांनी गदारोळ केला. या गोंधळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांचा परिचय करुन दिला.