Asian Games 2018 : पराभूत होऊनही सिंधूने इतिहास रचला
एबीपी माझा वेब टीम | 28 Aug 2018 03:14 PM (IST)
एशियाडमधील बॅडमिंटनच्या 56 वर्षांच्या इतिहासात रौप्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.
जकार्ता : एशियाडमध्ये बॅडमिंटनच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूला, चायनीज तैपेईच्या ताई झऊ यिंगकडून सरळ गेममध्ये पराभव स्वीकारावा लागला. परंतु तरीही सिंधूने इतिहास रचला आहे. एशियाडमधील बॅडमिंटनच्या 56 वर्षांच्या इतिहासात रौप्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. 1962 मध्ये आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये बॅडमिंटनचा समावेश झाला होता. भारतीय चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन कोर्टवर उतरलेल्या सिंधूने पहिला गेम 13-21 असा गमावला. यानंतर दुसऱ्या गेममध्ये तिने प्रतिस्पर्धी खेळाडूला टक्कर देण्याचा प्रयत्न केला, पण तिला यश आलं नाही. या गेममध्ये सिंधूला 16-21 असा पराभव स्वीकारावा लागला. महत्त्वाचं म्हणजे ताई झू यिंगकडूनच पराभूत झाल्याने सायना नेहवालला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ताई झू यिंगने पहिला गेम सहज जिंकला. हा गेम तिने 21-13 अशा फरकाने जिंकला. यिंगने सामन्यात सुरुवातीपासूने वर्चस्व प्रस्थापित केलं होतं, ज्याचा फायदा तिला झाला. यावेळी सिंधूने नेटवर फार चुका केल्या. परिणामी प्रतिस्पर्धी खेळाडूला सहजरित्या आघाडी घेण्याची संधी मिळाली. पहला गेम 16 मिनिटांत संपला. दुसऱ्या गेममध्ये पीव्ही सिंधूने आक्रमक सुरुवात केली. एक वेळ अशी होती की, दोन्ही खेळाडू 4-4 अशा बरोबरीत होत्या. मात्र यिंगने कमबॅक करत ब्रेकपर्यंत 7-11 अशी आघाडी घेतली. ब्रेकनंतर सिंधूने काऊंटर अटॅक करत काही पॉईंट्स घेतले. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. 18 मिनिटांच्या या गेममध्ये सिंधूला 16-21 असा पराभव स्वीकारावा लागला. अखेर भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.