कोल्हापूर: घोडागाडी शर्यतीदरम्यान एका तरुणाचा थरारक अपघात झाला. धावत्या गाडीतून पडल्यामुळे हा तरुण जखमी झाला आहे. कागल तालुक्यातील माद्याळ इथं काल सकाळी विना लाटी बैलगाडी, घोडागाडी स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी घोडागाडी चालकाच्या अतिउत्साहामुळे हा अपघात घडला.

या स्पर्धेवेळी घोडागाडी तुफान वेगात धावत होती. त्यावेळी हा तरुण घोडागाडीमध्ये उभा होता. छकडा गाडीत उभं राहून शड्डू मारण्याचा प्रयत्न या तरुणाने केला. मात्र प्रचंड वेगामुळे तो खाली पडला. त्याच्या पाठोपाठ अनेक घोडागाड्या आणि  मोटरसायकली येत होत्या. त्यापैकी एक घोडागाडीचं चाक त्याच्या अंगावरुन गेलं.

शर्यत पाहण्यासाठी जमलेल्या ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून  या चालकाला तातडीने बाजूला  काढल्याने अनर्थ टळला.

सध्या  राज्यात  घोडागाडी, बैलगाड्यांच्या स्पर्धेला  बंदी असली तरी अनेक खेडोपाड्यांमध्ये बैलगाड्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात.  त्याच पद्धतीने माद्याळमध्ये झालेली ही स्पर्धा आता वादग्रस्त होण्याच्या मार्गावर आहे.