जकार्ता : एशियाड स्पर्धेत चौदाव्या दिवशी भारताने दुसरं सुवर्णपदक पटकावलं आहे. ब्रिज क्रीडा प्रकारात भारताच्या प्रणब बर्धन आणि शिभनाथ सरकार या पुरुष जोडीने सुवर्णपदकाची कमाई केली. या सामन्यात 60 वर्षीय प्रणब आणि 56 वर्षीय शशिनाथ या जोडीने 384 गुण मिळवले.
एशियाड स्पर्धेतलं भारताचं हे 15 वं सुवर्णपदक ठरलं आहे. याबरोबरच भारताने 1951 साली दिल्लीमध्ये पार पडलेल्या पहिल्या एशियाड स्पर्धेतील 15 सुवर्णपदकांच्या कामगिरीची बरोबरी केली आहे.
चीनच्या लिक्सीन यँग आणि चेन वोन जोडीला रौप्यपदक मिळाले तर इंडोनेशियाच्या जोडीने कांस्यपदकाची कमाई केली. भारताच्या सुमित मुखर्जी आणि देबाब्रत मझुमदार यांनी 333 गुणांसह नववे स्थान मिळवले तर सुभाष गुप्ता आणि सपन देसाई यांचा भारतीय संघ 306 अंकांसह 12 व्या स्थानी आहे.
बॉक्सर अमित पंघालचा ‘सुवर्ण’ पंच
एशियाड स्पर्धेत भारताचा बॉक्सर अमित पंघालने आणखीन एका सुवर्ण पदकाची भर घातली आहे. 49 किलो वजनी गटात उझबेगिस्तानच्या हसनबॉय दुस्तमतॉवचा पराभव करत अमितने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. अमितने 3-2 अशा फरकाने सुवर्णपदक जिंकले.
भारताने एशियाड स्पर्धेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. एशियाड 2018 च्या स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारा अमित एकमेव बॉक्सर ठरला.