जकार्ता : भारताचा उदयोन्मुख भालाफेकपटू नीरज चोप्रानं एशियाडचं सुवर्णपदक पटकावून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. नीरजनं याआधी जागतिक ज्युनियर अॅथलेटिक्स आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदकाची कमाई करून दिली आहे.
नीरजनं जकार्तात पहिल्या प्रयत्नात 83.46 मीटर अंतरावर भालाफेक केली. मग तिसऱ्या प्रयत्नात त्यानं 88.06 मीटर ही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. याच कामगिरीनं त्याला एशियाडच्या सुवर्णपदकाचा मान मिळवून दिला.
चीनच्या लिउ किजेन याने 82.22 मीटर भालाफेक करत रौप्य पदकावर नाव कोरलं तर पाकिस्तानच्या अलशद नदीमला 80.75 मीटर भालाफेक करत कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.
जकार्ता एशियाड स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताने एकूण पाच पदकं जिंकली. बॅडमिंटनमध्ये सायना नेहवालने कांस्य पदक जिंकत इतिहास रचला. धारुन आयासामी पुरुषांच्या 400 मीटर अडथळ्याच्या शर्यतीत आणि सुधासिंग यांनी महिलांच्या ३००० मीटर्स स्टीपलचेस प्रकारात भारताला रौप्यपदकांची कमाई करून दिली आहे. तर नीना वरकिलनं लांब उडीत रौप्य पदकावर नाव कोरलं.
भारताला एकूण 41 पदकं
भारत या स्पर्धेत 41 पदकांसह नवव्या स्थानावर आहे. यामध्ये आठ सुवर्ण, 13 रौप्य आणि 20 कांस्य पदकांचा समावेश आहे.