नवी दिल्ली : देशात आज प्रथमच जेट्रोफा बियांपासून निर्मित इंधनावर 90 आसनी विमानाने यशस्वी उड्डाण केलं. स्पाईसजेटच्या बम्बार्डियर Q400 विमानावर हा प्रयोग करण्यात आला. डेहराडूनहून दिल्लीला हे विमान पोहोचलं. या विमानात जैविक जेट इंधन अर्थात बायो जेट फ्युएलचा वापर केला. यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, नितीन गडकरी आणि सुरेश प्रभू उपस्थित होते.
या विमानात 75 टक्के एव्हिएशन टर्बाइन फ्यूएल आणि 25 टक्के बायोफ्यूएल होतं. परीक्षणावेळी विमानात डीजीसीए आणि स्पाईसजेटच्या अधिकाऱ्यांसह 20 जण उपस्थित होते. हे उड्डाण जवळपास 25 मिनिटांचं होतं. या माध्यमातून विमानात जैविक इंधनाचा वापर करणारा भारत पहिला विकसनशील देश ठरला आहे. आतापर्यंत अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या विकसित देशांनाच हे शक्य झालं आहे.
जेट्राफा म्हणजे एरंडाचा प्रकार आहे. त्याच्या बियांपासून मिळणाऱ्या तेलापासून हे जेट इंधन तयार करण्यात आलं आहे. परीक्षणासाठी काऊन्सिल ऑफ सायन्टिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च आणि उत्तराखंडमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियमने या इंधनाची निर्मिती केली आहे.
भारतात बायो फ्युएलला परवानगी मिळाली तर कार्बन उत्सर्जन तर कमी होईलच, शिवाय कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये खर्च होणारे परकीय चलनही वाचेल.