Asian Champions Trophy 2023: भारतीय महिला हॉकी संघानं रविवारी (5 नोव्हेंबर, 2023) झालेल्या एकतर्फी अंतिम सामन्यात जपानचा 4-0 असा पराभव करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं आहे. भारतीय हॉकी संघानं दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावलं आहे.
भारताकडून संगीता (17व्या मिनिटाला), नेहा (46व्या मिनिटाला), लालरेमसियामी (57व्या मिनिटाला) आणि वंदना कटारिया (60व्या मिनिटाला) यांनी गोल डागले. संगीता आणि वंदना यांनी मैदानी गोल डागले, तर नेहा आणि लालरेमसियामी यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल डागत जपानला चारी मुंड्या चीत केलं.
रविवारी रांचीच्या मरंग गोमके येथील जयपाल सिंह अॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियमवर अंतिम सामना झाला. या विजयानंतर हॉकी इंडियानं ट्वीट करून प्रत्येक खेळाडूला 3 लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली. यासोबतच सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला दीड लाख रुपये दिले जातील.
जपानच्या कोबायाकावा शिहोनं 22 व्या मिनिटाला जपानसाठी गोल केला, परंतु व्हिडीओ रेफरलनंतर तिचा प्रयत्न नाकारला गेला. 52 व्या मिनिटाला जपानला पेनल्टी स्ट्रोकही मिळाला, मात्र काना उराटाचा फटका भारतीय गोलरक्षक सविता पुनियानं रोखला.
भारतीय हॉकी संघानं यापूर्वी स्पर्धेच्या साखळी टप्प्यात आणि 2023 आशियाई क्रीडा स्पर्धेच्या कांस्यपदकासाठीच्या प्लेऑफमध्ये जपानचा 2-1 अशा फरकानं पराभव केला होता. हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या चीननं दक्षिण कोरियाचा 2-1 असा पराभव करत तिसरं स्थान पटकावलं आहे.
चीनकडून चेन यी (तिसऱ्या मिनिटाला) आणि लुओ टिएंटियन (47व्या मिनिटाला) यांनी गोल केले. कोरियासाठी सामन्यातील एकमेव गोल अन सुजिनने पेनल्टी कॉर्नरवर केला. यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीतही चीननं कोरियाचा 2-0 असा पराभव केला होता.