आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीत भारताची पाकिस्तानवर मात
एबीपी माझा वेब टीम | 23 Oct 2016 07:11 PM (IST)
क्वालालम्पूर : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात केली आहे. भारताने पाकवर 3-2 असा शानदार विजय मिळवला. मलेशियाच्या कुआन्तानमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा दुसरा विजय ठरला आहे. त्यामुळे गुणतालिकेत भारताला वरचं स्थान गाठण्यात यश आलं आहे. या सामन्यात प्रदीप मोरनं 22 व्या मिनिटाला गोल करुन भारताचं खातं उघडलं होतं. पण मोहम्मद रिझवाननं 31 व्या आणि मोहम्मद इरफाननं 39 व्या मिनिटाला गोल डागून पाकिस्तानला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर रुपिंदर पाल सिंग आणि रमणदीप सिंगनं लागोपाठ गोल झळकावून भारताला विजय मिळवून दिला. रुपिंदरनं 43 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल डागला तर रमणदीपनं 44 व्या मिनिटाला निर्णायक गोल झळकावला.