मोहाली : विराट कोहलीच्या खणखणीत शतकाच्या जोरावर टीम इंडियानं मोहालीच्या मैदानात न्यूझीलंडला सात विकेट्स राखून धूळ चारली. या विजयाबरोबरच भारतानं पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी पुन्हा आघाडीही घेतली आहे.

विराटनं या सामन्यात नाबाद 154 धावांची खेळी तर केलीच, शिवाय महेंद्रसिंग धोनीच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 151 धावांची भक्कम भागीदारीही रचली. धोनीनं चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन 91 चेंडूंत 80 धावा फटकावून विराटला चांगली साथ दिली. त्यामुळेच भारताला 286 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करता आला.

***************************

मोहाली वनडे टीम इंडियाचा दणदणीत विजय, न्यूझीलंडवर सात विकेट्सनी मात

विराट कोहलीचं शानदार शतक, 10 चौकारांसह 104 चेंडूत सेंच्युरी

***************************

मोहाली : मोहालीच्या तिसऱ्या वन डेत न्यूझीलंडनं भारतासमोर विजयासाठी 286 धावांचं आव्हान दिलं आहे. न्यूझीलंडनं 49.4 षटकांत सर्व बाद 285 धावांची मजल मारली.

या सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमनं 61 धावांची खेळी केली. लॅथमनं रॉस टेलरच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारीही रचली. पण रॉस टेलर 44 धावांवर बाद झाला आणि न्यूझीलंडचा डाव गडगडला.

न्यूझीलंडची तीन बाद 153 धावांवरुन आठ बाद 199 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. पण त्यानंतर जेम्स नीशाम आणि मॅट हेन्रीनं नवव्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी रचून न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला.

जेम्स नीशामनं वन डेतलं आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं. नीशामनं 47 चेंडूंत 57 धावांची खेळी केली. भारताकडून उमेश यादव आणि केदार जाधवनं प्रत्येकी तीन विकेट्स काढल्या. तर जसप्रीत बुमरा आणि अमित मिश्राला प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या.

***************************

न्यूझीलंडच्या 49.4 षटकात सर्वबाद 285 धावा, किवींचं टीम इंडियाला 286 धावांचं आव्हान

केदार जाधवचे मधल्या फळीला दणके, न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद

***************************

मोहाली : मोहालीच्या तिसऱ्या वन डेत भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर न्यूझीलंडच्या संघात देवचिचच्या जागी जेम्स नीशामचा समावेश करण्यात आला आहे.

भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या पाच सामन्यांच्या वन डे मालिकेची तिसरी लढाई मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर खेळवली जात आहे. दिल्लीतल्या दुसऱ्या वन डेत न्यूझीलंडनं सहा धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे या मालिकेतली रंगत आणखी वाढली आहे.

टीम इंडियानं धर्मशालाची पहिली वन डे सहा विकेट्स राखून जिंकली होती आणि या मालिकेची दिमाखात सुरुवात केली होती. पण दिल्लीच्या दुसऱ्या वन डेत न्यूझीलंडनं सहा धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.