Jyothi Yarraji wins first gold for India : भारताची युवा धावपटू ज्योती याराजी हिने सुवर्ण कामगिरी करत इतिहास रचला आहे. ज्योतीने बॅंकॉकमध्ये सुरु असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (Asian Athletics Championships in Bangkok) सुवर्ण पदक पटकावलेय. ज्योतीने महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. ज्योतीने अवघ्या 13.09 सेकंदात 100 मीटर अंतर पार करत सुवर्णपदक पटकावलेय. आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आज भारताने तीन सुवर्णपदक पटकावली आहेत. त्याशिवाय एक कांस्य पदक मिळवलेय.
23 वर्षीय ज्योती याराजीने अवघ्या 13.09 सेकंदात 100 मीटर अंतर पार करत सुवर्णपदक मिळवले. जपानची असुका दुसऱ्या क्रमांकावर राहिली तिने 13.13 सेकंदात 100 मीटर अंतर पार केले. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या ओकी मासुमी हिने 13.26 सेकंदात हे अंतर पार केले. ज्योती हिने 100 मीटरमध्ये सुवर्णपदक पटकावत विक्रमला गवसणी घातली आहे. महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताने हे पहिलेच सुवर्ण पदक जिंकले आहे.
भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या ज्योतीवर कौतुकाचा वर्षाव होतोय. अनुराग ठाकूर यांच्यासह अनेकांनी ट्वीट करत ज्योतीच्या कामगिरीचे कौतुक केलेय.
अजय कुमार सरोजने 1500 मीटरमध्ये जिंकले गोल्ड -
अजय कुमार सरोज याने पुरुष 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णकामगिरी केली. त्याने 1500 मीटर अंतर 3.41.51 सेकंदात पार करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. जापानचा युशुकी ताकाशी हा 3:42.04 सेकंदासह दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनच्या ली डेजु याला 3:42.30 सेकंद इतका कालावधी लागला.