Shadab Khan on Virat Kohli: आशिया चषक 2022 च्या महासंग्रामाला (Asia Cup 2022) आजपासून (27 ऑगस्ट) सुरूवात होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना यजमान संघ श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. तर भारताचा पहिला सामना रविवारी (28 ऑगस्ट) पाकिस्तान विरुद्ध आहे. या सामन्याआधीच वातावरण तापलेले असताना पाकिस्तानचा गोलंदाज शादब खाननं भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीबाबत सर्वांना चकीत करणारं विधान केलंय. 


विराट कोहलीला जवळपास तीन वर्षांपासून त्याच्या कारकिर्दीतील खराब टप्प्यातून जावा लागत आहे. विराट कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात शेवटचं शतक झळकावलं होतं. तर, गेल्या सहा महिन्यापासून त्याला 50 धावांचा टप्पाही गाठता आला नाही. विराट कोहली 20-30 धांवाचा टप्पा गाठण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. महत्वाचं म्हणजे, ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी विराट कोहलीचं फॉर्ममध्ये परतणं भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं आहे. 


शादाब खान काय म्हणाला?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी शादाब खान म्हणाला की, "विराट कोहली हा एक दिग्गज क्रिकेटपटू आहे. त्यानं दमदार कामगिरीच्या जोरावर क्रिडाविश्वावर छाप सोडलीय. जेव्हा विराट फलंदाजी करण्यासाठी मैदानात येतो. त्यावेळी थोडी भिती वाटते. यामागचं कारणही तसंच आहे. तो एक मोठा खेळाडू आहे. त्यानं फॉर्ममध्ये परत यावं आणि शतकही करावं, पण आमच्याविरुद्ध नको. त्यानं आमच्याविरुद्ध मोठी खेळी करावी, ही आमची मुळीच इच्छा नाही.”


पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचं प्रदर्शन
विराट कोहलीनं पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात दमदार फलंदाजी केलीय. पाकिस्तानविरुद्ध सात डावात त्यानं 77.75 च्या सरासरीनं 311 धावा केल्या आहेत. यावेळी विराट कोहलीनं तीन अर्धशतक झळकावली आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्रईक रेट 118.25 इतका होता. एवढंच नव्हे तर, पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीनं तीन वेळ सामनावीराचा पुरस्कार जिंकलाय. 


विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
विराट कोहलीने आतापर्यंत 102 कसोटीत 8 हजार 74 धावा आणि 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 हजार 344 धावा केल्या आहेत. तर, 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 हजार 308 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं कसोटीत 254 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. तर एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 इतकी आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला अद्याप शतक झळकावता आलं नाही.


हे देखील वाचा-